महाआरोग्य शिबिराची यशस्वी अंमलबजावणी करावी-जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

छत्रपती संभाजीनगर,२८ जुलै /प्रतिनिधी :- शहर परिसरामध्ये 01 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिराच्या अनुषंगाने प्राथमिक व द्वितीय तपासणीच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिका, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनांच्या समन्वयातून महाआरोग्य शिबिराची यशस्वी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

या आढावा बैठकीसाठी महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी जर्नादन विधाते, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा यांची उपस्थिती होती.

महाआरोग्य शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी लागणाऱ्या वैद्यकीय साहित्यासह शहरातील प्रशासकीय प्रभागनिहाय तपासणीसाठी विविध पथकाची नियुक्ती करावी. या पथकामध्ये डॉक्टर, नर्स व आशासेविका यांचा समावेश करावा. नागरिकांच्या घरोघरी जाऊन केलेली आरोग्य  तपासणी बाबतचे अहवाल, आजारासंबधी वैद्यकीय अहवाल गुगलशिट मध्ये जिओ फेन्सींगच्या माध्यमातून अद्यावत करावेत.

महानगरपलिकेचा आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा, खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षण घेत असलेले विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच आरोग्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थाची मदत घेऊन समन्वयाने महाआरोग्य शिबिर यशस्वीपणे करावे. असे पाण्डेय यांनी सांगितले.

जी. श्रीकांत म्हणाले की, महाआरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी नियोजन केले असुन प्रभागनिहाय प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यासाठी प्राधान्याने कमी उत्पन्न गट असलेला आणि जास्त लोकसंख्या असलेल्या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी अधिकचे मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्राथमिक तपासणी अहवालात दुय्यम तपासणी साठी महात्मा फुले जनआरोग्य योजना राबवित असलेल्या रुग्णालयामध्ये तसेच महानगरपालिका, खासगी रुग्णालये प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी विविध प्रकाराच्या आरोग्य तपासण्या करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. याबाबत सर्व संबंधित यंत्रणेला निर्देश दिले असून आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेल्या वेगवेगळ्या पथकांना दोन सत्रात प्रशिक्षण व वैद्यकीय उपकरणांचे उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे जी.श्रीकांत यांनी सांगितले.