तोक्ते चक्रीवादळामुळे ४४७ घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती

सिंधुदुर्गनगरी, १६मे /प्रतिनिधी –

तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात दिवसभरात 447 घरांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे. तसेच 37 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. 143 ठिकाणी झाडे पडली असून 3 शाळांचे, 10 शेडचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नुकसान झालेल्या शेडमध्ये एका स्मशान शेडचाही समावेश आहे. त्याशिवाय 14 शासकीय इमारतीचे आणि 23 विद्युत पोल पडले असून 2 विद्युत वाहिन्यांचेही नुकसान झाले आहे.

तालुकानिहाय नुकसानीची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून तिथे 160 घरांचे नुकसान झाले आहे. 15 गोठ्यांचे, 2 शाळांच्या नुकसानीची माहिती आहे. 3 विजेचे खांबही पडले आहेत. तसेच एक स्मशानभूमी शेड आणि एक शेळीपालन शेडचेही नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यात 90 घरांचे, 10 गोठ्यांचे, एका शाळेचे, 4 शासकीय इमारतींचे, एका शेडचे नुकसान झाले आहे. तसेच 6 विजेच्या खांबांचेही नुकसान झाले आहे. 6 ठिकाणी झाडं कोसळण्याची घटना घडली आहे. सावंतवाडी तालुक्यात 57 घरांचे, 3 गोठ्यांचे, 2 शेडचे आणि 2 विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. तसेच 57 ठिकाणी झाडे पडली आहेत. कुडाळ तालुक्यात 43 घरांचे, 3 गोठ्यांचे, 4 शेडचे आणि 3 शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. तालुक्यात 12 ठिकाणी विजेच्या खांबाचे नुकसान झाले आहे. 53 ठिकाणी झाडे कोसळली आहेत. वेंगुर्ला तालुक्यात 40 घरांचे, 2 गोठ्यांचे आणि 6 शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. तर 5 ठिकाणी झाडे पडली आहेत. मालवण तालुक्यात 34 घरांचे, एका गोठ्याचे, एका शेडचे नुकसान आणि 3 ठिकाणी झाडे पडली आहेत. तर एका विद्युत वाहिनीचे नुकसान झाले आहे. देवगड तालुक्यात 22 घरांचे, 3 गोठ्यांचे आणि एका शासकीय इमारतीचे नुकसान झाले आहे. एका विद्युत वाहिनीचे नुकसानीबरोबरच 6 ठिकाणी झाडे पडली आहेत. दोडामार्ग तालुक्यात एका घराचे नुकसान झाले आहे तर 8 ठिकाणी झाडे पडली आहेत.

तर जिल्ह्यात एकूण 144 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील खवणे येथील 35 व्यक्ती, निवती मेंढा येथील 23 व्यक्ती, देवगड तालुक्यातील आनंदवाडी – तारामुंबरी येथील 44 व्यक्ती आणि देवगड येथील 7 व्यक्ती, मालवण तालुक्यातील देवबाग येथील 35 व्यक्तींचा समावेश आहे.

Image

सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी दिलेल्या माहितीनूसार जिल्ह्यातील कोणतीही मच्छिमार बोट समुद्रात गेलेली नाही. सर्व बोटी किनाऱ्यावर आहेत.

सदरची माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सदरची माहिती जिल्हा आपत्ती व्यव्सथापन प्राधिकरण यांच्याकडून देण्यात आली आहे.

तोक्ते चक्रीवादळाने गती बदलल्याने रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान

रत्नागिरी :- कोकण किनारपट्टीच्या समांतर वाटचाल करीत असलेल्या तोक्ते चक्रीवादळाच्या गतीत बदल झाल्याने त्याचे रुपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले. त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील जवळपास सर्व गावांना बसला. यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे.

आज दुपारी साधारण 12 च्या सुमारास सदर वादळाच्या रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केल्याच्या स्थितीनंतर वाऱ्याचा वेग ताशी 130 मैलापर्यंत वाढल्याने मोठ्या प्रमाणावर झाडांच्या फांद्या तुटणे, झाडे उमळून पडणे, वीजेचे खांब व तारा तुटुन विद्युत पुरवठा खंडीत होणे असे प्रकार घडले आहेत. प्राथमिक माहितीनुसार  रत्नागिरी व राजापूर तालुक्यात काही घरांची पडझड झाली आहे. तथापि जीवित हानीचे वृत्त नाही.

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत करण्यात आलेल्या  नियोजनामुळे राजापूर तालुक्यात कच्च्या घरात राहणाऱ्या 652 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. सांयकाळी 05 वा. च्या सुमारास वाऱ्याचा वेग 120 किमी प्रती तास वाढण्याचा अंदाज बघून तत्काळ नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम प्रशासनाने केले. रत्नागिरी शहर, राजापूर तालुका, साखरीनाटे, आंबोळगड, मुंबई-गोवा महामार्ग तसेच किनाऱ्यालगतच्या गावात मोठ्या प्रमाणावर पोफळी, नारळाची झाडे पडली. या चक्रीवादळामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

समुद्र किनारी जिल्ह्यातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

‘तोक्ते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ३८९६, सिंधुदुर्ग- १४४ आणि रायगड  जिल्ह्यातील २५०० लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने  दिली आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार उद्या दिनांक 17 मे 2021 रोजी ताशी 70 ते 80 कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. तर मालवण ते वसई या समुद्र किनाऱ्यावर 3.3 मीटर ते 6.2 मीटर उंचीच्या लाटा उद्या दि. 17 मे 2021 रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत उसळणार आहेत. तसेच वेंगुर्ला ते वास्को या किनारपट्टीवर लाटांची उंची 3.2 मीटर ते 6.0 मीटर इतकी असणार आहे. त्यामुळे या काळात नागरिकांनी तसेच मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच समुद्राच्या जवळ लाटा पाहण्यासाठी उभे राहू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Image

तोक्ते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण प्रशासकीय यंत्रणा सज्ज

नवी मुंबई, दि. ६ : “तोक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील नागरिकांच्या संरक्षणासाठी कोकण विभागातील  जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच आपत्ती काळात प्रशासन सज्ज असल्याबाबत जिल्हा अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. आता या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर भयानक “तोक्ते” चक्रीवादळात झाले आहे. याचा फटका गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसत आहे. काल कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने कहर केला आहे. तर बऱ्याच ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.”तोक्ते” चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता कोकण विभागातील सर्व नौका समुद्रकिनारी दाखल झाल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या 512 नौका समुद्रकिनारी सुखरूप पोहचल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या 96 नौका समुद्रकिनारी सुखरूप पोहोचल्या आहेत.दिघी बंदर येथे मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील 25 बोटी आश्रयासाठी आल्या आहेत.

चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मच्छीमारांसाठी तसेच समुद्रकिनारी रहिवासी असलेल्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने अलर्ट जारी केला होता.

रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.

किनारपट्टीवर धोकादायक क्षेत्रातील राजापूर आणि गुहागर तालुक्यातील नागरिकांचे स्थलांतरण झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील ८५ कच्च्या घरातील ३६५ नागरिकांचे परिसरातील आजू बाजूच्या  घरात स्थलांतर करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा रुग्णालय सज्ज

रायगड जिल्हा रुग्णालयातील जिल्हा रक्तपेढी जिल्हाधिकारी निधी चौधरी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे सतर्क व सज्ज असल्याची माहिती जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. दीपक गोसावी व रक्त संक्रमण तंत्रज्ञ श्री. हेमकांत सोनार यांनी दिली आहे.

चक्रीवादळाचा कोकण रेल्वेला फटका

सकाळी नेत्रावती एक्सप्रेस ट्रेन मडगाववरून थिवीमकडे जात असताना या ट्रेनला अपघात झाला. एक भलं मोठं झाड ट्रेनवर कोसळल्यानं मध्येच ही ट्रेन थांबवावी लागली. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. लोहमार्गावर पडलेल्या या झाडाला हटवून रेल्वेसेवा लवकरच सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती कोकण रेल्वेतील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. कोकणातील वातावरण झपाट्याने बदलत आहे. परिणामी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. तसेच अरबी समुद्रात सुरू असलेल्या चक्रीवादळामुळे राज्यात गारवा निर्माण झाला आहे.

चक्रीवादळ येत्या 24 तासात तीव्र होण्याची शक्यता

तौते चक्रीवादळ येत्या चोवीस तासात अधिक तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. सध्या हे चक्रिवादळ मुंबईच्या दक्षिणेस 450 किलोमीटरवर असून पुढे गुजरातच्या दक्षिण-दक्षिणपूर्व दिशेला 840 किमी अंतरावर आहे. ते येत्या चोवीस तासात गुजरातकडे सरकरण्याची शक्यताही हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.

कोकण किनारपट्टी आणि गोव्यात 16 मे रोजी काही भागात तसेच घाटमाथ्यावर मूसळधार ते अतिमूसळधार तर उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी 17 मे रोजी मूसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात 16 मे रोजी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील तर 17 मे पासून 18 मेच्या सकाळपर्यंत किनारपट्टीच्या उत्तर भागात वाऱ्याचा वेग ताशी 65 ते 75 किमी असू शकतो. तो वाढत तो ताशी 85 किलोमीटर इतका वाढू शकतो असा इशाराही देण्यात आला आहे.

महाराष्ट्राची किनारपट्टी, खासकरुन किनारपट्टीच्या उत्तरेकडच्या भागातला समुद्र येत्या चोवीस तासात खवळलेला असेल. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये आणि जे मच्छिमार समुद्रात असतील त्यांनी तातडीनं किनाऱ्यावर यावं अशी सूचना देण्यात आली आहे.