छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लवकरच पूर्ण करणार – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई,२७ जुलै /प्रतिनिधी :-छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लवकरच पूर्ण करण्यात येणार असून आवश्यक तो निधीही देण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी  विधान परिषदेत दिली.

छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक निधीअभावी प्रलंबित असल्याबाबतचा प्रश्न सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता.

श्री. सामंत म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारण्याकरिता शासनाकडून 35.19 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 23 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे स्मृती वन व स्मारकाचे 60 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. अद्यापपर्यंत या प्रकल्पावर 9.40  कोटी इतका निधी खर्च झालेला आहे. या स्मारकाच्या प्रलंबित कामांच्याबाबत आजच मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे बैठक आयोजित करण्यात आली आहे, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या सह अन्य सदस्यांनी सहभाग घेतला.