“देवेंद्र फडणवीस आणि गृहखात्याचं डोकं फिरलं की काय? “

मुंबई पोलिस दलात कंत्राटी पद्धतीने पोलिसांची भरती

मुंबई ,२५ जुलै /प्रतिनिधी :- गृहखात्याकडून मुंबई पोलिस दलात कंत्राटी पद्धतीने पोलिसांची भर्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत ११ महिन्यांसाठी या कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार आहे. गृहखात्याने घेतलेल्या या निर्णयाविरोधात विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी यावरु गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर यावरुन टीका केली आहे.

मुंबई पोलिसांत कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृहखात्याने घेल्याने आमदार भाई जगताप यांनी संताप व्यक्त केला आहे. “देवेंद्र फडणवीस आणि गृहखात्याचं डोक फिरलं की काय? मुंबई पोलीस दल हे जगातील दुसऱ्या नंबरचे पोलीस दल आहे. त्या मुंबई पोलीस दलात ११ महिन्यांसाठी पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. पैसे घेऊन बदल्या करण्यात येतात. पोलीस खात्यात अनागोंदी कारभार सुरु आहे”, अशी टीका जगताप यांनी केली आहे.

चार महिन्यांपूर्वी पोलीस भरती झाली होती. तेव्हा पदव्युत्तर शिक्षण असलेले तरुण नोकरीच्या आमिषाने मुंबईत आले. त्यांना कोणत्याही पद्धतीची सोय करण्यात आली नव्हती. यावेळी एका तरुणाचा साप चावल्याने मृत्यूही झाला होता. या पोलीस भरतीचं काय झालं. एखाद्या ठिकाणी मोठा अपघात किंवा घटना घडली तर हे कंत्राटी पोलीस काय करणार?” असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले.

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे. मात्र, पोलीस आणि सैन्यात कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत आहे. याने महाराष्ट्र आणि देश कसा चालणार? असं म्हणत देवेंद्र फडणवीस हा निर्णय रद्द करतील अशी अपेक्षा भाई जगताप यांनी व्यक्त केली आहे.

रोहित पवार संतापले

मुंबई पोलिसांत मनुष्यबळाची तीव्र टंचाई असल्याने गृह खात्याने तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त ११ महिन्यांसाठी कंत्राटी पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. मात्र, गृहखात्याच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला.

याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, “राजकारण पक्ष आणि नेते फोडाफोडीची नवीन प्रथा सुरु करुन महाराष्ट्राचं शालीन राजकारण भाजपाने मलीन केलं. आता त्याचं प्रमाणे कंत्राटी पोलिसांची भरती करुन आधीच बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेची पूर्ण वाट लावण्याचा तर हा डाव नाही ना? अशी शंका येते. लाखो युवा पोलिस भरतीसाठी प्रयत्न करत असताना त्याकडं दुर्लक्ष करुन कंत्राटी भरती करणाऱ्या राज्य शासनाचा तीव्र निषेध”, असं ट्विट रोहीत पवार यांनीी केलं आहे.

पोलीस दलात मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून राजकीय त्यांच्या संरक्षणामुळे आणखी मनुष्यबळाची गरज आहे. दहीहंडी, गणेशशोत्सव, नवरात्र, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. त्यामुळे कंत्राटी पोलील भरती करण्याचा पोलीस आयुक्तांचा आग्रह होता, असं गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. राज्य सरकारने २१ जानेवारी २०२१ रोजी ७,०७६ शिपाई आणि ९९४ वाहन चालकांच्या भरतीला मंजुरी दिली आहे. ही भरती प्रक्रिया आणि शिपायांचं प्रशिक्षण पूर्ण व्हायला दोन वर्षांचा काळ लागणा आहे. तो पर्यंत ही ११ महिन्यासाठी कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा प्रखर विरोध

राज्यामध्ये बेरोजगारीचा गंभीर विषय असताना राज्यात कंत्राटी पद्धतीने ३ हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करत २८९ अनव्ये कंत्राटी पद्धतीने पोलीस भरतीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद

सभागृहात प्रखर विरोध दर्शविला आहे.

गृह विभागाने कंत्राटी पद्धतीने पोलीस भरतीत सहायक शिपाई ते सहायक निरीक्षक अशी ४० हजार ६२३ पदे मंजूर करण्यात आलेली असल्याची माहिती दानवे यांनी परिषद सभागृहात दिली.एकीकडे केंद्र सरकार २ कोटी रोजगार देण्याची घोषणा करते तर दुसरीकडे ९ खासगी संस्थाना वेगवेगळ्या पद्धतीने रोजगार देण्यासाठी नेमणूक सरकारने केली आहे. जगात स्कॉटलंड यार्ड धर्तीवर मुंबई पोलिसांची ओळख आहे. असे असताना कंत्राटी पद्धतीने ३ हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतलेला निर्णय हा चुकीचा असून पोलीस हे सरकारी अखत्यारीतच असले पाहिजे, अशी भूमिका मांडत अंबादास दानवे यांनी कंत्राटी पोलीस भरतीला कडाडून विरोध दर्शविला.