समृद्धी महामार्गावर महामृत्युंजय मंत्राचं वाचन करुन यंत्र पुरलं ; आयोजकांवर गुन्हा दाखल

बुलढाणा ,२५ जुलै  / प्रतिनिधी :-समृद्धी महामार्ग हा सुरुवातीपासूनच वादाच्या आग्रस्थानी राहीला आहे. सुमृद्धी महामार्गाचे दोन टप्पे प्रवासासाठी खुले करण्यात आले आहेत. मात्र या महामार्गावर होणारे अपघात यामुळे हा महामार्ग सतत वादात राहीला आहे. आता समृद्दी महामार्ग एका नव्या कारणाने चर्चेत आहे. या महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी मगामृत्यूंजय यंत्र लावून महामृत्युंजय मंत्राचा सव्वाकोटी जप करण्यात आला होता. आता या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्याविरोधात महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा येथे झालेल्या खाजगी बसच्या अपघाता २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या मृतांच्या आत्म्यास शांती लाभावी, तसंच या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी स्वामी समर्थ परिवाराच्या वतीने महामृत्युंजय मंत्राचा सव्वाकोटी जप करण्यात आला. तसंच अपघात झालेल्या स्थळी महामृत्युंजय यंत्र पुरण्यात आलं. यावेळी या कार्यक्रमाचं आयोजन करणारे निलेश आढाव यांनी या विधीमुळे पाच किलोमीटर क्षेत्रात अपघात होणार नाही. आणि झालाचं तर जीवितहानी होणार नाही, असा दावा केला होता.

या प्रकारावर अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे हमीद दाभोळकर यांनी आक्षेप घेत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. पोलीस अधिक्षक सुनील कडासने यांनी गटनेची गंभीर दखळ घेतली. याप्रकरणी सिंदखेड राजा पोलीस ठाण्याचे शिपाई श्रावण डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या निलेश रामदास आढाव यांच्यावर सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई महाराष्ट्र नरबळी, इतर अमानुष अनिष्ठ, अघोरी प्रथा व जादुटोना प्रतिबंधक व समुळ उच्चाटन अधिनियम २००३ च्या कलम २ व ५ नुसार करण्यात आली आहे.