बार्टीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई,२​५ जुलै /प्रतिनिधी :- बार्टीमध्ये विविध प्रशिक्षण देण्यासाठी संस्था निवडीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवड करण्यात येते. मात्र, सध्या संस्थांच्या निवडीबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असले तरी विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही, यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले.

यासंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, विद्यार्थी हित जोपासण्यासाठी संस्था निवड प्रक्रियेत पारदर्शकता व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण राबविण्याकरिता वित्त विभागाची वित्तीय नियमावली व उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या दि.१ डिसेंबर २०१६ रोजीच्या खरेदी धोरणानुसार व केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संस्था निवडीकरीता ई-निविदा प्रक्रिया शासनाचे धोरण आहे. सद्य:स्थितीत हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

तरीही या विषयासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल, विद्यार्थांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेण्यात येईल, असे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

यासंदर्भात झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, जयंत पाटील, अॅड.अनिल परब, महादेव जानकर, जयंत पाटील, अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.