पुढच्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील सर्व भागात मुसळधार पावसाचा इशारा

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,१९ जुलै /प्रतिनिधी :- राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. ते आज विधानभवन परिसरात  माध्यमांशी बोलत होते.मुंबईसह ठाणे आणि उपनगर परिसरात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे. यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात रेल्वे रुळावर पावसाचं पाणी साचल्यानं मध्य आणि हर्बर लाईनवर लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यावेळी त्यांनी नागरिकांना महत्वाचं आवाहन देखील केलं आहे.

नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईसह परिसरात खुप पाऊस झाल्यानं निर्माण झालेल्या पूरस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी एनडीआरएफ तसंच जिल्हा प्रशासनांना देखील निर्देश देण्यात आले आहेत. आपण सकाळपासूनच मुख्य सचिव तसंच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहोत. नागरिकांची गैरसोय होऊ नये तसंच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीनं मदत व बचाव कार्य सुरु करावं, अशा सुचना प्रशासनाला दिल्या असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सकाळपासूनच आपण मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत. तसेच मुंबई व परिसरातील मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकर सोडले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे सुरक्षितस्थळी हलविलेल्या नागरिकांना भोजन, शुद्ध पेयजलासह मूलभूत सुविधा द्याव्यात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारतीय हवामान विभागाने कोकणातील काही जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच राज्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीत सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क राहावे. पावसामुळे सुरक्षितस्थळी हलविलेल्या नागरिकांना भोजन, शुद्ध पेयजल मिळेल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मुंबईसह राज्यात काही ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज सायंकाळी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी त्यांनी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत विविध सूचना दिल्या. यावेळी ग्रामविकास आणि पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, आमदार भरत गोगावले, मुख्य सचिव मनोज सौनिक, आपत्ती निवारण विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, आपत्ती नियंत्रण कक्षाचे संचालक अप्पासाहेब धुळाज आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर आला आहे. यापासून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. या नागरिकांची भोजन, शुद्ध पेयजलासह, निवाऱ्याची व्यवस्था करावी. शेजारील मध्यप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहावे. त्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवावा. स्थानिक प्रशासनाने सतर्क आणि दक्ष राहावे. पुराचा धोका असलेल्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात. पशुधनाचीही काळजी घेण्यास सांगावे.

कोकणातील रस्त्यांवर दरड कोसळण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर दळण- वळणाच्या सुविधा पूर्ववत करण्यासाठी पथके गठित करावीत. आवश्यक तेथे वायरलेस आणि सॅटेलाइट टेलिफोनचा वापर करून नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावे. तसेच कोकण विभागातील शाळांना गुरुवार २० जुलै २०२३ रोजी सुट्टी घोषित करावी. आवश्यक तेथे पाऊस आणि पूरस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्रशासनाने याबाबतचा निर्णय घ्यावा, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. यावेळी ग्रामविकास आणि पंचायत राज, पर्यटन मंत्री श्री. महाजन यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, मध्य प्रदेशात होणाऱ्या पावसामुळे तापी नदीला पूर येतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतर्क राहावे. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी रायगड, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, सातारा, ठाणे येथील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत तेथील पूर परिस्थितीची माहिती घेतली.

नागरिकांनी पर्यटनस्थळी जावू नये

राज्यातील विविध भागात पाऊस कोसळत आहे. कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी  पर्यटनस्थळी जाण्याचे टाळावे. समुद्र किनाऱ्यांवर जावू नये. पोलीस यंत्रणेने पर्यटनस्थळांवर गस्त घालावी, असेही निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे, पर्यटन मंत्री श्री. महाजन यांनी दिले. प्रधान सचिव श्री. गुप्ता यांनी राज्यातील पाऊस, पूरस्थिती आणि केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.

मुसळधार पावसातही मुंबईतील जनजीवन सुरळीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई महानगरात यंदा नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे चोखपणे पार पडली आहेत. त्याचा प्रत्यय जोरदार पावसावेळी पाण्याचा वेगाने निचरा होवून आला आहे. त्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे कौतुक केले पाहिजे, असे उद्गार काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पावसाळापूर्व कामे योग्यरितीने पार पडल्याची पोचपावती दिली.

मुंबईत पाऊस कोसळत असताना महानगरपालिका आयुक्तांसह सर्व विभागांचे सहायक आयुक्त व सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहेत, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. पावसाची परिस्थिती व अंदाज लक्षात घेवून स्थानिक प्रशासनाने योग्य ते निर्णय घेण्याचे निर्देश राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुंबईत सतत कोसळत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल यांच्या निर्देशानुसार, मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना (नर्सरी ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या)  उद्या गुरुवार 20 जुलै 2023 रोजी  महानगरपालिकेने सुटी जाहीर केली आहे.

भारतीय हवामान खात्याने मुंबईतील पावसाच्या शक्यतेसाठी दिलेल्या ‘ऑरेंज अलर्ट‘ च्या पार्श्वभूमीवर नागरी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालिन व्यवस्थापन विभागाला आज भेट दिली. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर जावू नये, सुरक्षितस्थळी राहावे, पर्यटकांनी अकारण समुद्र किनारी जावू नये, असे आवाहन करतानाच घराकडे परतीचा प्रवास करत असणाऱ्या चाकरमान्यांची आवश्यकता असेल तेथे तात्पुरता निवारा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्याचे निर्देशही यावळी मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले.

यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (शहर) श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुधाकर शिंदे, सहआयुक्त (शिक्षण) अजीत कुंभार, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलीन सावंत, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडळकर, संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर आदींनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने माहिती दिली.

मुंबईतील जनजीवन, महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना, वाहतूक व्यवस्था तसेच पाणी साचणाऱ्या सखल ठिकाणांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षातून घेतला. बेस्ट आणि एसटी प्रशासनालाही नागरिकांसाठी वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. हिंदमाता, परळ, गांधी मार्केट, मिलन भुयारी मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग या सखल भागातील स्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. कोणत्याही ठिकाणी पाणी साचले नाही. महानगरपालिकेची यंत्रणा पूर्णपणे कार्यरत असल्याचा हा परिणाम आहे. संपूर्ण मुंबईत मिळून सुमारे ४५० ठिकाणी पावसाचे पाणी उपसा करणारे पंप लावल्याचा परिणाम म्हणून पाण्याचा वेगाने निचरा झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

मुंबईत पर्जन्य जलवाहिन्या, मलनिसारण वाहिन्या आदींच्या प्रवेश मार्गांवर (मॅनहोल) असलेल्या झाकणाखाली जाळ्या लावण्याच्या सूचना महानगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत सखल भागातील सुमारे ३ हजार मॅनहोल कव्हरखाली जाळ्या लावण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. उर्वरीत ठिकाणच्या मॅनहोल जाळ्या लावण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करावी. ज्याठिकाणी मॅनहोल चोरीचे प्रकार निदर्शनास येत आहेत, अशा ठिकाणी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

विभागीय पातळीवर खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत. कोणत्याही नागरिकाच्या तक्रारीवर तातडीने कार्यवाही करावी. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजवून सर्व रस्त्यांवर वाहतूक तत्काळ सुरू होईल, असे पहावे, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असून कोणतीही दुर्घटना अथवा अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत, त्यानुसार सर्व यंत्रणा दक्ष आहे, असेही मुख्यमंत्री महोदयांनी नमूद केले.

चिपळूणसह जिल्हात खबरदारी, मदतकार्याच्या उपाययोजना करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने धोकापातळी  गाठली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे,  या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. हवामान खात्याने येत्या चार दिवसात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना तातडीने कराव्यात, मदतकार्य तसेच आपत्ती  व्यवस्थापनाच्या टीम तैनात ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आमदार शेखर निकम देखिल उपस्थित होते.

राज्यात पावासाचा जोर गेल्या दोन दिवसांपासून  वाढला आहे. हवामान खात्याने येत्या चार दिवसात कोकणासह राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे, तसेच वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. वाशिष्ठीचे पाणी धोकापातळीपर्यंत वाढले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत खबरदारीच्या उपाययोजना म्हणून आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पूरामुळे बाधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. दोन वर्षापूर्वी वाशिष्ठी नदीला आलेल्या पूरामुळे चिपळूणमध्ये मोठी वित्तहानी झाली होती. त्यावेळी वाशिष्ठी नदीच्या पात्रातील गाळ काढण्यासाठी विशेष निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाची माहिती सुध्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.

पावसात अडकलेल्यांसाठी ‘एसटी’ आली धावून

दिवसभर कोसळणाऱ्या  मुसळधार पावसामुळे  रेल्वेची वाहतूक काही ठिकाणी खंडित झाली होती, तर काही ठिकाणी संथपणे सुरू होती. अशावेळी कार्यालयातून अथवा आपल्या कामावरुन घरी निघालेल्या मुंबईच्या चाकरमान्यांना लवकरात लवकर सुरक्षित घरी पोहोचता यावे, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री  व एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी एसटीला मुख्य रेल्वे स्थानकाजवळ आपल्या बसेस तैनात करण्यास सांगितले.

तसेच त्या बसेस द्वारे रेल्वेस्थानकात अडकलेल्या प्रवाशांची मोफत सोय करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ‘एसटी’च्या मुंबई आणि ठाणे विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला ठाणे, कल्याण इत्यादी महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावर आपल्या १०० पेक्षा जास्त बसेस  लावून तेथून  प्रवाशांची त्यांच्या निवासी क्षेत्रापर्यंत मोफत वाहतूक करण्याचे नियोजन केले आहे.

ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना गुरुवार २० जुलैला सुटी

कोकण विभागात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. २० जुलै, २०२३ रोजी कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुटी जाहीर केली आहे.सर्व  संबंधित जिल्हाधिकारी यांनी यास अनुसरून त्यांच्या स्तरावर आज रात्री दहाच्या आत आदेश काढून सर्व संबंधित शालेय आस्थापनेस कळवावे, जेणेकरून शाळा मुलांना व पालकांना वेळेमध्ये माहिती मिळेल असा शासन आदेश संचालक, राज्य आपत्ती व्यवस्थापन यांनी काढ ला आहे.

नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच राज्यस्तरावर सर्व यंत्रणा सज्ज – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

राज्यात येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच राज्यस्तरावर २४ x ७ नियंत्रण कक्ष सुरु आहे. नदीच्या पुरामुळे नदीने बाधित गावांना सर्तकतेचा इशारा स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आलेला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

विधानपरिषदेत औचित्याच्या मुद्द्याला उत्तर देताना मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील बोलत होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सचेत प्रणालीद्वारे राज्यस्तरावरून पूर्व इशारा म्हणून सूचित करण्यात आले आहे. गडचिरोली १५ लाख, रायगड ४० लाख तसेच वर्धा, चंद्रपूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील पूरप्रवण क्षेत्रांतील नागरिकांना इशारा दिलेला आहे. बचाव पथक व जिल्हाधिकारी कार्यालय हे सातत्याने समन्वय ठेवून हवामानाचा अंदाज व सद्य:स्थिती व स्थानिक स्थितीचे आकलन करुन बचाव पथके तैनात केलेली आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १८ नागरिकांना निवारा क्षेत्रात हलवले होते. आता पूर परिस्थिती सामान्य झाल्याने त्यांना मूळ गावी पाठविण्यात आले. भामरगडमधील गडचिरोलीतील १,६८४ गावांपैकी १०० गावे पुलावर पाणी आल्याने संपर्कात नाही. भामरगड तालुक्यातील गावे आहेत. एसडीआरएफचे एक पथक तैनात आहे. ३१ जवानांपैकी १ उपनिरीक्षक व ८ जवान मिळून एक पथक असे तीन पथके वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केली आहेत. रत्नागरी जिल्ह्यातील चिपळूण व खेड येथील एकूण ८७, रायगड येथील ९९१, ठाणे जिल्ह्यातील ४५८ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

सद्य:स्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे व रायगड रसायनी या भागात पूर परिस्थिती आहे. बचाव पथके कार्यरत असल्याने जीवितहानी झाल्याची नोंद नाही. राज्यात सर्व जिल्ह्यात पावसाची नोंद झालेली आहे. मात्र, सद्यस्थितीत गडचिरोली, रायगड व रत्नागिरी जिल्हे वगळता उर्वरीत जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवलेली नाही. पूर परिस्थितीबाबत बचाव कार्यासाठी म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ च्या पथकांना आपत्कालिन परिस्थितीकरिता पूर्व तैनात करण्यात आले आहे. एनडीआरएफचे पथक पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई तर, एसडीआरएफची पथके गडचिरोली, नांदेड येथे तैनात केली आहेत, असेही मंत्री श्री.पाटील म्हणाले.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार २० जुलै २०२३ रोजी रेड अलर्ट असलेले जिल्हे निरंक असून ऑरेंज अर्लट असलेले जिल्हे रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सातारा, पुणे असे आहेत.

चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया (ऑरेंज अलर्ट म्हणजे २४ तासांत जर ११५ ते २०४ मि.मी. पाऊस एका ठिकाणी पडत असल्यास ऑरेंज अलर्ट म्हटले जाते.) म्हणून त्या ठिकाणी सर्व जिल्हाधिकारी बचाव पथकासह तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. २१ जुलै २०२३ रोजी रेड अलर्ट निरंक असून ऑरेंज अलर्ट – रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे या जिल्ह्यात असून २२ जुलै २०२३ रोजी रेड अलर्ट – निरंक असून- रायगड, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे, असेही मंत्री श्री.पाटील म्हणाले.

जलसंपदा अंतर्गत असणाऱ्या धरणातून सोडणाऱ्या विसर्गाचे नियंत्रण केले जात असून अतिवृष्टी पूर व धरणातून विसर्ग यामध्ये प्रभावी संनियंत्रण व विभागामध्ये समन्वय ठवून जीवित व वित्त हानी होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. होणाऱ्या नुकसानीचे सर्वेक्षण हे शासनाच्या प्रचलित स्थायी आदेशानुसार करण्याचे निर्देश दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. चिपळूण मधील वाशिष्टी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री आणि पातळगंगा नद्यांनी धोका पातळी ओलंडली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील राजोली, हालेवारा, एटापल्ली या गावातील लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

रायगड व गडचिरोली, पालघर आणि चंद्रपूर जिल्ह्याने पूर परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे. सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे या जिल्ह्याची उद्याची स्थानिक स्थिती पाहून जिल्हाधिकारी निर्णय घेतील. गेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस झालेले ०५ जिल्हे मुंबई शहर (९८.४), रायगड (१६३), सिंधुदुर्ग (११८.६), रत्नागिरी (९३), ठाणे (८०.४) असे आहेत, अशी माहिती मंत्री श्री. पाटील यांनी दिली.