पंतप्रधान मोदी आणि शरद पवार एका मंचावर येणार! मोदींना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर

पुणे : या वर्षीचा लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी यासंबंधीची घोषणा केली. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. गेल्या आठवड्यातच राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर पवार-मोदी प्रथमच एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे खरच हे मान्यवर एकत्र येतील का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. शिवसेना आणि त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फुटले असून हे साम, दाम, दंड, भेद चा वापर करुन भाजप विरोधी पक्षातील नेत्यांना फोडून सरकार स्थापन करत असल्याचा आरोप केला जात आहे.यावेळी ट्रस्टचे विश्वस्त रोहित टिळक म्हणाले की, मंगळवार १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची १०३ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. दीपक टिळक यांच्या हस्ते मोदींना हा पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्काराचे यंदाचे हे ४१वे वर्ष आहे. दरम्यान, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेअंतर्गत देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली. तसेच देशवासीयांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन देशाला जागितक पटलावर महत्त्वाचे स्थान मिळवून दिल्याबद्दल ट्रस्टच्या विश्वस्तांनी मोदींच्या नावाची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे.

या पुरस्काराच्या वितरण सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देखील आमंत्रण देण्यात आलं आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.