‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत ९१ प्रकरणांची सुनावणी; सामोपचाराने प्रकरणे मिटविण्यासाठी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले प्रयत्न

कोल्हापूर,६ जुलै  / प्रतिनिधी :- महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जनसुनावणी घेण्यात आली. या सुनावणीच्या वेळी ९१ तक्रारी प्राप्त झाल्या. यात सर्वाधिक केसेस या कौटुंबिक छळ, त्रासाच्या होत्या. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रीतम पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पोलीस, प्रशासन, विधी सेवा, समुपदेशक असलेल्या तीन पॅनलनी तयार सर्व केसेसचा निपटारा केला. अनेक प्रकरणांमध्ये आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी समेट घडवून आणण्यासाठी चर्चा करुन मार्गदर्शन केले. यावेळी पाच कौटुंबिक केसेसच्या प्रकारांमध्ये समेट घडवून आणून पाचही जोडपी पुन्हा सुखाने नांदावीत यासाठी समुदेशन करण्यात आले. या जोडप्याना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

प्राप्त 91 केसेस मधील 64 केसेस वैवाहिक, कौटुंबिक होत्या. सामाजिक- 5, मालमत्ता, आर्थिक- 6 व इतर विषयाशी संबंधित 16 केसेस होत्या.