गुणी, चतुरस्त्र कलावंताला मुकलो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. 22 : मराठी रंगभूमी, चित्रपट आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनामुळे गुणी आणि चतुरस्त्र अशा कलावंताला मुकलो आहोत,अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, मराठी कुटुंबातून आलेल्या आशालताजींनी मराठी संगीत रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीत आपले असे स्थान निर्माण केले होते. कवयित्री, गायिका, लेखन अशा क्षेत्रात गती असलेल्या आशालता यांनी अजरामर अशा भूमिका साकारल्या. मराठी आणि हिंदी चित्रपटांतील या भूमिका केवळ त्यांच्यासाठीच असाव्यात इतक्या त्या उत्कृष्ट अभिनेत्री होत्या. मराठी रंगभूमीही त्यांनी गाजविली. संगीत नाटक आणि व्यावसायिक नाट्यसृष्टीत त्यांचा उत्कृष्ट कलाकार म्हणून दबदबा होता. नव्या होतकरू कलाकारांनाही त्या जवळच्या मार्गदर्शक वाटत. त्यामुळे त्यांनी या पिढीतही जिव्हाळ्याचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनामुळे आपण गुणी आणि चतुरस्त्र अशा कलावंताला मुकलो आहोत. त्यांचे कला क्षेत्रातील योगदान विसरता येणार नाही, असेच आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना विनम्र श्रद्धांजली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेत्री आशालताताई वाबगावकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून रंगभूमीची प्रदीर्घ काळ सेवा करणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्रीला आज आपण मुकलो आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आशालताताई या शास्त्रीय संगीताचं ज्ञान, जाण असलेल्या चतुरस्त्र अभिनेत्री होत्या. कोकणी, मराठी, हिन्दीसह त्यांनी शंभरहून अधिक नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये अभिनय केला. त्यांच्या नाटक व चित्रपटांनी लोकप्रियतेचा इतिहास घडवला आहे. जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी रंगभूमीची, कलाक्षेत्राची सेवा केली. त्यांचं निधन धक्कादायक, मनाला चटका लावणारं आहे. नाटक, चित्रपट, मालिकांमधून काम करणाऱ्या सर्व कलावंत बंधू-भगिनींनी, यापुढच्या काळात अधिक सावध राहून, स्वत:ची, कुटुंबाची, सहकाऱ्यांची, समाजाची काळजी घ्यावी, सुरक्षित राहावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

आशालता यांच्या निधनाने अष्टपैलू, गुणी कलाकार गमावला – सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख

मराठी  चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर  यांच्या निधनाने अष्टपैलू आणि गुणी कलाकार गमावला आहे, या शब्दात ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर  यांना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

श्री.देशमुख आपल्या आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आशालता वाबगांवकर यांनी कोंकणी आणि मराठी नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अपने पराये या हिंदी चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. तर रायगडाला जेव्हा जाग येते हे त्यांचे पहिले नाटकही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते.  मराठी चित्रपट सृष्टीत ‘उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नव-याला, वहिनीची माया’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले. संगीतावर आधारित ‘गर्द सभोवती’ हे पुस्तकही वाचकांच्या पसंतीस उतरले.

आशालता वाबगावकर यांनी आपल्या सोज्वळ आणि सहज अभिनयामुळे चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटविला होता. विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी समर्थपणे साकारल्या. त्यांच्या निधनाने एक अष्टपैलू कलावंत हरपला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *