राष्ट्रवादीमध्ये लेटर बॉम्ब:५४ पैकी ५१ आमदारांना भाजपसोबत युती करायची होती-प्रफुल्ल पटेल यांनी केला मोठा गौप्यस्फोट

मुंबई : नुकत्याच झालेल्या राजकीय नाट्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलाढाली होत आहेत, पक्षांबाबतही अनेक दावे केले जात आहेत. त्यातच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल  यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. गेल्यावर्षी महाविकास आघाडी  सरकार कोसळण्याच्या मार्गावर असताना राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ५१ आमदारांनी भाजपसोबत युती करावी, असं पत्र शरद पवार यांना दिलं होतं, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांना दिली.

राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांना भाजपसोबत जाण्याची इच्छा आहे, अशा शक्यता गेले काही महिने वर्तवल्या जात होत्या. त्यात अजित पवारांचं नावही सातत्याने येत होतं. प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ५४ पैकी ५१ आमदारांनी भाजपसोबत जाण्याच्या आपल्या भावना लेखी स्वरुपात मांडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडे दिल्या होत्या. भाजपकडे आमदारांची संख्या जास्त असल्याने आपण जर युतीचा विचार केला तर राज्यात स्थिर सरकार स्थापन व्हायला मदत होईल, अशी राष्ट्रवादीच्या आमदारांची धारणा होती.

राष्ट्रवादीच्या आमदारांतर्फे शरद पवारांना कळवण्यात आलेला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्य सरकारच्या वतीने अजित पवार जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा त्यांनी अनेक आमदारांना राज्यामध्ये विकासनिधीसंदर्भात तरतूद करुन दिली होती. परंतु नवीन सरकार आल्यानंतर या सगळ्या कामांना स्थगिती मिळेल, त्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता होती. त्यामुळे भाजपसोबत युतीची भावना अनेक आमदारांनी व्यक्त केली होती.

अजित पवारांनी २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीसांसोबत जेव्हा शपथ घेतली होती त्यावेळेसदेखील अनेक आमदारांची इच्छा होती की राज्यात एक स्थिर सरकार स्थापन व्हावं, मात्र तेव्हा शरद पवारांची अशी इच्छा नसल्यामुळे अनेक आमदारांनी शरद पवारांना पाठिंबा दिला. मात्र आता ही दुरुस्ती केली असल्याचं मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलं. यानंतर आता या राजकीय नाट्यात आणखी काय काय गौप्यस्फोट होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.