नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही – अजित पवार

मुंबई,४ जुलै /प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना सोबत घेत शिंदे सरकारशी हातमिळवणी केली. यानंतर रविवारी (२जुलै) उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील ८ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या झालेल्या शपथविधीला आपला पाठिंबा नसल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं. यानंतर राष्ट्रवादीत अजित पवार विरुद्ध शरद पवार असा गट दिसून आला. आज अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्धघाटन देखील केलं.

अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज मंत्रालयात हजेरी लावली. यावेळी अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं. पंतप्रधान मोदी यांच्या इतका दुसरा मोठा राजकीय नेता कुणीच नाही, त्यांच्याशिवाय देशाला पर्याय नसल्याचं राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. शपथविधीनंतर झालेल्या पहिल्याचं कॅबिनेटच्या बैठकीला अजित पवार हे त्यांच्या आठही मंत्र्यांसह उपस्थित राहीले.

रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासकामांमुळे सरकारमध्ये सामील झाल्याचं भुजबळ म्हणाले होते. यावेळी अजित पवार यांनी देखील मोदी यांचं तोंडभरुन कौतूक करत देश त्यांच्यामुळेच आगेकूच करत असल्याचं म्हटलं होतं. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य वेगळ्या विचारांचं असतं तर विकास कामात आणि निधीत कमतरता राहाते, त्यामुळे आम्ही सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, असं अजित पवार यांनी सांगितलं होतं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनियुक्त मंत्र्यांसह मंत्रालयातील महापुरूषांच्या प्रतिमांना केले अभिवादन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळात अलिकडेच समाविष्ट करण्यात आलेल्या मंत्र्यांसह मंत्रालयातील जीजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

मंत्री सर्वश्री छगन भुजबळ,  दिलीप वळसे-पाटील,  हसन मुश्रीफ,  धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अनिल पाटील तसेच कु. आदिती तटकरे यांनीही महापुरूषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह लोकप्रतिनिधी, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.