शिवसेना (ठाकरे गट) महापालिकेवर १ जूलै रोजी विराट मोर्चा काढणार-उद्धव ठाकरे

मुंबई ,२० जून /प्रतिनिधी :-ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी मुंबईला कोणी मायबापच राहिला नसल्याची टीका केली आहे. महापालिका विसर्जित होऊन वर्ष गेलं. मात्र, या बेकायदेशीर सरकारमध्ये निवडणुका घेण्याची हिंमत नाही, असं त्यांनी यावेळी म्हटलं. मुंबईला कोणी मायबापच राहिलेला नाही. जे काही सुरु आहे ती लुटालुट सुरु आहे. १ जूलै रोजी शिवसेना (ठाकरे गट) महापालिकेवर विराट मोर्चा काढणार असल्याची घोषणा यावेळी ठाकरे यांनी केली आहे.

महापालिकेच्या ठेवींमधून विकासकाम केली जात असून आतापर्यंत बराच पैसा याच एफडींमधून वापरला गेला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. हा पैसा जनतेचा पैसा असून या पैशाचा हिशोब द्यावा लागेल. मुंबईच्या असंतोषाला आम्ही वाचा फोडणार असून १ जूलैला आम्ही विराट मोर्चा काढणार असल्याचंही ते म्हणाले. या सगळ्यांना जाब विचारणारं कुणीही नाही. एकेकाळी मुंबई महापालिका ६५० कोटी तुटीत होती. याता महापालिका ९२ हजारांच्या ठेवीपर्यंत गेली आहे. हे पैसे महापालिकेच्या ठेवी होत्या. कोस्टल रोड, जनतेच्या उपयोगाची कामे होती. आता कोणत्याही कामाला महापालिकेचा पैसा बेधडक वापरला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. १ जूलै रोजीचा मोर्चा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात निघणार असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

गद्दार कितीही काहीही झालं तरी गद्दारच राहणार असल्याचही ठाकरे यावेळी म्हणाले. लोकांच्या मनात यांच्याविषयी असंतोष असल्याने कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या कपाळावरील गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. त्यांच्या नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोप होत असताना त्यांना क्लिन चीट मिळत आहे. याला काही अर्थ नाही, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.