अमित शाहांचे उद्धव ठाकरेंना ४ सवाल; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका 

नांदेड, १० जून / प्रतिनिधी :- नांदेडमधल्या जाहीर सभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात भाजपकडून महा-जनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नांदेडमध्ये आले होते. या सभेतून अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसंच उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर येऊन माझ्या ४ प्रश्नांचं उत्तर द्यावं, असं आव्हानही अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात गेले नाहीत. 2019 च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला आणि ते काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीत जाऊन बसले. ज्यावेळी युतीची बोलणी करायला गेलो होतो, त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार, असं उद्धव ठाकरे यांनीदेखील सांगितलं होतं, असं झालं का नाही, याचं उत्तर ठाकरेंना द्यावं,’ असं टीकास्त्र अमित शाह यांनी सोडलं.

‘कलम 370 हटवलं हे योग्य केलं का नाही? राम मंदिर उभारणी करता ते योग्य करता की नाही? मुस्लिम आरक्षण संविधानिक नाही, मुस्लिम आरक्षण पाहिजे का नाही? हेदेखील उद्धव ठाकरे यांनी सांगावं,’ असं अमित शाह म्हणाले. जेवढे प्रश्न उभे केले आहेत, या सगळ्यांची उत्तरं उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर द्यावीत. दोन दगडांवर पाय ठेवू नयेत, असा निशाणा अमित शाह यांनी साधला. तसंच शिवसेना आम्ही फोडली नाही तर शिवसैनिकांनी फोडल्याचंही अमित शाह म्हणाले.

ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी

  • ट्रिपल तलाकच्या निर्णयाने आपण सहमत अहात की नाही? उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी.
  • मुस्लिम आरक्षण नको असे भाजपचे मत ठाकरेंना काय वाटते आहे? अमित शहा यांचा सवाल
  • समान नागरी कायदा यावा ही भाजपची भूमिका आहे. यावर आपली भूमिका काय?
  • कर्नाटकात वीर सावरकरांचा इतिहासांच्या पुस्तकांतून हटवू इच्छितात, याला तुमचा पाठिंबा आहे का. तुम्ही दोन्ही पाऊल वेगवेगळी ठेवू नका आमच्या प्रश्नाची उत्तरे द्या असे अमित शहा यांनी म्हटले आहे.

काँग्रेसवरही निशाणा

या सभेमध्ये अमित शाह यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. काँग्रेसचं सरकार असताना देशात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षांमध्ये इतिहास घडवला. 9 वर्षांमध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप लागला नाही. 9 वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सुरक्षित ठेवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं, असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं आहे.

‘राहुलबाबा म्हणायचे मंदिर बनायेंगे, पर तारीख नही बताएंगे, पण मी सांगतो 2024 ला अयोध्येत भव्य राम मंदिर तयार असेल. राहुल गांधी परदेशात जाऊन देशाचा अपमान करतात. परदेशात जाऊन देशाबद्दल असं बोलत नाहीत. तुम्हाला माहिती नसेल तर वरिष्ठ काँग्रेस नेत्यांना विचारा. देशात राहुल गांधी यांना कुणी ऐकायला राहिलं नाही, म्हणून ते परदेशात जाऊन बोलतात,’ अशी टीका अमित शाह यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदींचे कौतुक

अमित शहा म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार सुरू केली. शेतकऱ्यांना 12 हजार रुपये देत आहोत. कलम 370 कुणालाच हटवायची नव्हती. त्यामुळे देशात रक्ताच्या नद्या वाहतील असे मत विराेधक व्यक्त करत होते. मात्र, भाजपने हे केले आणि काश्मीरला भारताचा भाग बनवले. कुणाचीही साधा दगड मारण्याची हिंमत झाली नाही, कारण हे नरेंद्र मोदी सरकार आहे.

देशात राहुल गांधींना ऐकणारा वर्ग कमी

अमित शहा पुढे बोलताना म्हणाले की, देशात राहुल गांधींना ऐकणारे कमी आहे, म्हणून बाहेर देशात जाऊन राहुल गांधी देशाच्या विरोधात बोलत आहेत. बाहेर देशात जाऊन देशाचा अपमान करत नसतात हे राहुल गांधींनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना विचारुन घ्यायला हवे.

मराठवाडा हा प्रांत हैदाराबादचा हिस्सा होता. देश स्वातंत्र झाला तरी मराठवाड्याला स्वातंत्र मिळालेले नव्हते. हैदराबादच्या राज्यकर्त्यांनी जनतेवर अनेक अत्याचार केले. वल्लभभाई पटेल यांनी आक्रमक होत मराठवाडा मुक्त केला होता. भाजपचे सरकारची 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराश्ट्रातील जनतेने 2014 आणि 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. यात मोदी सराकारने जनतेसाठी अनेक योजना आणल्या. जनतेसाठी हिताचे निर्णय घेतले. 2004 ते 2014 सोनिया गांधींनी जे सरकार चालवले ते सर्वात भ्रष्ट सरकार होते. यात शरद पवार देखील मंत्रिमंडळात होते. या यूपीए सरकारने 12 लाख कोटींचे घोटाळे केले आहे.