निवडणूक चिन्हाबाबत निर्णय न घेण्याचे निवडणूक आयोगाला निर्देश

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची आता सोमवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी आता सोमवारी ८ ऑगस्टला होणार आहे. दरम्यान, निवडणूक चिन्हाबाबत कोणताही निर्णय न घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.

सर्वांच्या लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे न्यायालयाने म्हटले आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या नेतृत्वातील आजची सुनावणी पार पडली.

ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत, तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी, मुकुल रोहीतगी सारखे दिग्गज विधिज्ञ यांनी कोर्टात युक्तिवाद केला. तर अरविंद दातार हे निवडणूक आयोगाची बाजू मांडत होते. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरू झालेली कायदेशीर लढाई आता शिवसेना कोणाची यावर येऊन पोहोचली आहे.

शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत एक कॅव्हेट दाखल केले. यामध्ये त्यांनी ‘आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये,’ अशी मागणी केली होती.

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ तब्बल ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केले. या सर्व घडामोडीनंतर आम्हीच खरी शिवसेना असा दावा शिंदे गटाने केला होता. आगामी काळात शिंदे गटाकडून शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरदेखील दावा केला जाऊ शकतो हे पाहता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल केले.

आज कोर्टाने निवडणूक आयोगाला निर्णय येईपर्यंत पक्षाच्या चिन्हासंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नका असे आदेश​ दिले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालायातील याचिकांवर निर्णय येईपर्यंत शिवसेनेकडेच धनुष्यबाण राहणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा दिला मानला जात आहे.

चिन्हाबाबत सुप्रीम कोर्ट काय म्हणालं?
कोर्टात सुनावणी सुरू असेपर्यंत निवडणूक आयोगानं शिवसेना कुणाची याबाबत निर्णय घेऊ नये, अशी मागणी शिवसेनेचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केली. तर एखादा गट मूळ पक्ष असल्याचा दावा करत असेल तर आयोगाला निर्णय घ्यावा लागेल, असं निवडणूक आयोगाचे वकील अरविंद दातार यांनी सांगितलं.

तेव्हा निवडणूक आयोगाची सुनावणी थांबवता येणार नाही. निवडणूक आयोग सुनावणी घेऊ शकतो, मात्र निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश सरन्यायाधीश रामण्णा यांनी दिले.

त्यामुळं आता सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात, तर धनुष्यबाण आणि पक्ष कुणाचा यावर निवडणूक आयोगात अशा दोन दोन लढाया ठाकरे विरुद्ध शिंदे गटाला लढाव्या लागणार आहेत…

लवकरच राज्यात स्थनिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत धनुष्यबाण आपल्यालाच मिळावं, यासाठी दोन्ही गटांनी प्रयत्न सुरू केलेत. धनुष्यबाण चिन्ह मिळवायचं असेल तर संसदीय पक्षासह मूळ पक्षातही उभी फूट पडल्याचं सिद्ध करावं लागणार आहे.

त्यासाठी आमदार आणि खासदारांपाठोपाठ जास्तीत जास्त जिल्हाप्रमुखांना देखील गळाला लावण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे गटानं सुरू केलेत. तर आपणच मूळ शिवसेना आहोत, हे पुराव्यानिशी सिद्ध करण्यासाठी ठाकरे गटानं प्रतिज्ञापत्र गोळा करण्याची मोहीमच सुरू केलीय. निवडणूक आयोग आता नेमके कोणते पुरावे ग्राह्य धरणार, त्यावर धनुष्यबाण कुणाच्या हातात पडणार, याचा फैसला होणार आहे.