महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे यांना निरोप

छत्रपती संभाजीनगर , १ जून / प्रतिनिधी :- महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे हे 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर बुधवारी (31 मे) निवृत्त झाले. पावणेदोन वर्षांपासून ते महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते.  महावितरणच्या वतीने त्यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे होते. तर मंचावर छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, मध्य प्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत ‍वितरण कंपनीचे संचालक सचिन तालेवार, मुख्य अभियंता भुजंग खंदारे, महापारेषणचे माजी संचालक उत्तम झाल्टे,‍ निवृत्त मुख्य अभियंता अनिल भोसले, किशोर परदेशी, अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, संतोष सांगळे उपस्थित होते. यावेळी प्रकाश जमधडे व त्यांच्या पत्नी अनिता जमधडे यांचा महावितरणच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. 

यावेळी सर्व वक्त्यांनी जमधडे यांच्या महावितरणमधील कारकिर्दीबद्दल गौरवोद्गार काढले. ग्राहकांना सेवा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची तसेच महावितरणबाहेर केलेल्या सामाजिक कार्याची त्यांनी वाखाणणी केली. मनोगत व्यक्त करताना जमधडे यांनीही महावितरणमध्ये काम करताना जनतेची सेवा करता आल्याचे समाधान व्यक्त केले.  कनिष्ठ अभियंता ते अधीक्षक अभियंता अशा विविध पदांवर काम करताना कंपनीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ग्राहकांचे मोलाचे सहकार्य लाभले. औरंगाबाद शहरात सुरळीत वीजपुरवठ्यासह ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमास जमधडे यांचे कुटुंबीय व मित्रपरिवारासह महावितरणचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.