संजय राऊतांनी आमच्या पक्षात चोंबडेगिरी करू नये

अजित पवारांनंतर आता नाना पटोलेंचाही हल्लाबोल

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमच्या पक्षात चोंबडेगिरी करू नये, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊतांना फटकारले आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटूंब विषयावर लेख लिहिणा-या संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी सुद्धा आमच्या पक्षात कोणतीही ढवळाढवळ करण्याची तुम्हाला गरज नाही, अशा स्पष्ट शब्दांत संजय राऊत यांची कान उघाडणी केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल राजकीय निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. दरम्यान, शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा, यासाठी मनधरणी सुरू आहे. शरद पवारांच्या या निर्णयाचा महाविकास आघाडीवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होते आहे. पण, याच वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक रंगली आहे.

पटोले यांनी राऊतांवर निशाणा साधतांना सांगितले की, संजय राऊत हे काही आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये चोमडेगिरी करू नये आणि गांधी कुटुंबावर बोलणे म्हणजे, सुर्यावर थुंकण्यासारखे आहे. ज्या कुटुंबाने बलिदान दिले आहे, पंतप्रधानपद सोडले आहे, राहुल गांधी यांनी अध्यक्षपद दुसऱ्याला दिले आहे, त्यांच्यावर राऊतांकडून आक्षेप घेतले जातात. हे बरोबर नाही, असे पटोले यांनी निक्षून सांगितले.

पटोले म्हणाले, मल्लिकार्जून खर्गे हे अनेकदा आमदार, खासदार राहिले आहेत. खर्गे हे आमचे मोठे नेते आहेत. त्यांनी आपले आयुष्य पक्षासाठी खर्च केले. संघटनात्मक काम त्यांनी केले. त्यामुळे खर्गे यांच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेणे, आणि गांधी परिवारावर आरोप करणे, हे योग्य नाही. संजय राऊतांनी चोमडेगिरी थांबवावी़. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनीही सांगितले होते की, माझ्याविषयी, माझ्या पक्षातील प्रवक्ते बोलतील, बाकीच्यांना मी वकीलपत्र दिलेले नाही, याचा दाखल देत पटोलेंनी राऊतांना टोला लगावला.