‘मन की बात’चे १०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाकडून देशभरात १३ महत्वाच्या ठिकाणी प्रोजेक्शन मॅपिंग शो

नवी दिल्ली,​३०​ एप्रिल  / प्रतिनिधी:- पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरून प्रसारीत होणाऱ्या मन की बात या लोकप्रिय कार्यक्रमाचे १०० भाग पूर्ण झाल्याबद्दल सांस्कृतिक मंत्रालयाने देशभरातील १३ महत्वाच्या  ठिकाणी एकाचवेळी, प्रोजेक्शन मॅपिंग शोची मालिका आयोजित केली.

या  ध्वनी आणि प्रकाशाच्या प्रोजेक्शन मॅपिंग शो मध्ये सर्वसामान्य भारतीयांच्या प्रेरणादायी कथा, सांस्कृतिक वारसा यांचं दर्शन घडवत,  देशानं केलेल्या प्रगती दर्शवण्यात आली.

मन की बात या कार्यक्रमाची  3 ऑक्टोबर 2014 पासून सुरुवात झाल्यानंतर, प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शन  वर या कार्यक्रमाचे नियमित प्रसारण होत आहे.  राज्यकारभारासाठी लोककेंद्रीत आणि समावेशक दृष्टिकोन बाळगण्याबाबत पंतप्रधानांना असलेला विश्वास आणि इच्छा, यांचं या कार्यक्रमात प्रतिबिंब दिसते. 

20-25 मिनिटे चाललेला हा विशेष शो, राष्ट्र उभारणीच्या संकल्पनेनं विणलेला आणि  लोककेंद्रीत होता. हा खेळ ज्या ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्या त्या स्थळाचा आणि सभोवतालच्या प्रदेशाचा वारसा आणि ऐतिहासिक मूल्य याव प्रकाशझोत टाकण्यात आला. या 13 महत्त्वाच्या स्थळांमध्ये नवी दिल्लीतील लाल किल्ला आणि प्रधान मंत्री संग्रहालय, ओदिशातील सूर्य मंदीर, हैदराबादमधील गोवळकोंडा किल्ला, तामिळनाडूमधील वेल्लोर किल्ला, मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, झारखंडमधील नवरत्ननगर किल्ला, जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमधील रामनगर किल्ला, आसाममधील रंगघर, लखनौमधील रेसिडेन्सी इमारत, गुजरातमधील मोढेरा येथील सूर्य मंदिर आणि राजस्थानमधील चित्तोडगड किल्ला, यांचा समावेश होता.

हे प्रोजेक्शन मॅपिंग शो चे खेळ,  लोकांसाठी विनामूल्य उपलब्ध होते आणि ही संध्याकाळ अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी, त्या त्या ठिकाणी प्रदर्शनासारख्या विविध उपक्रमांची मांडणी करण्यात आली होती.  उपस्थितांना यावेळी मन की बातचे याआधी प्रसारित झालेले भाग पाहता ऐकता येत होते, मेसेज वॉलवर त्यांच्या कल्पना भित्तीसंदेशाच्या रूपात मांडता येत होत्या आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना केलेल्या छायाचित्र स्थळांवर, छायाचित्रे काढता येत होती.  हा कार्यक्रम भारताची विविधता, संस्कृती आणि प्रगती साजरा करणारा  खरा उत्सव होता.