परदेशी आणि भारतीय प्रशिक्षकांमध्ये चार वर्षांचा करार – किरेन रिजीजू

भारतीय ऑलिम्पिक संघटना अध्यक्षांनी या निर्णयाचे केले कौतुक

नवी दिल्‍ली,  3 जुलै 2020


2024 आणि 2028 च्या ऑलिम्पिकवर शासनाने लक्ष केंद्रित केले असताना, ऑलिम्पिकशी बांधिलकी असलेले खेळाडू सातत्याने एका प्रशिक्षकाबरोबर  प्रशिक्षण घेतील.  त्यांची कामगिरीत सुधारणा  घडवून आणण्यासाठी, परदेशी आणि भारतीय प्रशिक्षक आता चार वर्ष ऑलिम्पिक चक्रासह त्यांच्या करारांची आखणी करणार  आहेत.

या निर्णयाबद्दल बोलताना, केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री श्री किरेन रिजीजू म्हणाले,`कोणत्याही देशातील क्रीडा क्षेत्रात प्रशिक्षक हा कणा असतो आणि आमच्या खास अॅथलिटसाठी योग्य प्रशिक्षण निश्चित करणे, हे ऑलिम्पिकसह सर्व प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताची संधी सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हा निर्णय 2024 आणि 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या तयारीसाठी भारताच्या दीर्घकालीन आराखड्याचा एक भाग आहे. मला खात्री आहे की आमच्या खेळाडूंचा यामुळे  निश्चित लाभ होईल.`

प्रशिक्षकांची कामगिरी आणि संबंधित एनएसएफच्या शिफारशीच्या आधारे प्रशिक्षकांचा चार वर्षांचा करार केला जाईल. हा करार जरी चार वर्षांचा असला, तरी या कराराचा दर वर्षी आढावा घेतला जाईल आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमधील खेळाडूच्या कामगिरीद्वारे प्रशिक्षकांच्या सर्वंकष कामगिरीनुसार त्यांच्या करारामध्ये वाढ करण्यात येईल.  

सरकारच्या निर्णयावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. नरिंदर ध्रुव बत्रा म्हणाले की,`मी या निर्णयाचे स्वागत करतो आणि क्रीडा मंत्रालयाचे, क्रीडा मंत्र्यांचे आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे आभार मानतो. अलिकडेच क्रीडामंत्री, एनएसएफचे संबंधित अधिकारी यांच्यासह झालेल्या बैठकीत मुद्दा मांडण्यात आला होता की परदेशी प्रशिक्षकांसह दीर्घकालीन करार करण्यात यावेत. विशेषत्वाने सध्याच्या काही महिन्यांच्या सक्तीच्या मिळालेल्या खंडानंतर या निर्णयामुळे खेळाडूंना आपल्या कारकिर्दीचा मोठा पल्ला गाठण्यास मदत होईल. विद्यमान प्रशिक्षक या खेळाडूंना ओळखतात आणि त्यामुळे ते त्यांना उत्तमरितीने घडवू शकतील.` डॉ. बत्रा यांनी पुढे नमूद केले की, `प्रशिक्षांचे वारंवार बदलणे म्हणजे खेळाडूला नवीन प्रशिक्षकांच्या सिद्धांताशी सातत्याने जुळवून घ्यावे लागते आणि प्रशिक्षकांच्या बाबतीतही तसेच घडते. काहीवेळा याचा खेळाडूंच्या कामगिरीवरही परिणाम होतो. या निर्णयामुळे 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धांवर आणि 2023 मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धांवरही त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकेल. सर्व प्रशिक्षक निश्चितच खेळाडूंची कामगिरी वृद्धिंगत करतील आणि भारतासाठी अधिक पदके मिळवण्याचा  प्रयत्न करतील.`दरम्यान, टोकियो 2020 ऑलिम्पिक  पुढे ढकलण्यात आल्यामुळे सर्व परदेशी प्रशिक्षकांचे करार 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *