मोबाईल संत्रा सेंटरचे कृषीमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरण

अमरावती, २८  एप्रिल / प्रतिनिधी :-राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात अमरावती विभागाची खरीपपूर्व आढावा बैठक झाली. तत्पूर्वी बडनेरा येथील दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्र यांच्यातर्फे निर्मित मोबाईल संत्रा सेंटरचे वितरण कृषी मंत्र्यांच्या हस्ते शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटाला करण्यात आले.

सालोरा खुर्द येथील संत ज्ञानेश्वर पुरुष बचत गटाला संत्रा मोबाईल सेंटर वितरित करण्यात आले . या गटातील 11 पैकी चार शेतकऱ्यांकडे संत्रा पीक आहे . तसेच गावातील बारा शेतकऱ्यांनी या गटात संत्रा पुरवण्याबाबत हमीपत्र दिले आहे .तसेच तिवसा महिला ॲग्रो उत्पादक केंद्र यांनाही यावेळी संत्रा मोबाईल सेंटरचे वितरण करण्यात आले.

      संत्रा मोबाईल सेंटर हे दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्राने स्वतः निर्माण केली आहे. जिल्हा नियोजन व विकास समिती मधील नावीन्यपूर्ण योजनेतंर्गत  या यंत्रामध्ये मानवी हस्त स्पर्शाशिवाय संत्र्याची साल, बिया पूर्णतः विलग होवून रस निघतो. तसेच यात शीतगृहाची व्यवस्था असल्यामुळे रस थंडगार मिळतो.  याबाबतची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अन्नप्रक्रिया विभागाचे राहुल घोगरे यांनी दिली.

शेतकरी आणि महिला उद्योजकांना उद्योग उभारणी करण्यासाठी उपयुक्त असलेल्या या  संत्रा मोबाईल सेंटर नागरिकांच्या  पसंतीस उतरेल, असा विश्वास कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. के.पी . सिंह यांनी व्यक्त केला. यावेळीकृषी विज्ञान केंद्राचे.डॉ. प्रतापराव जायले, प्रफुल्ल महल्ले, केंद्र समन्वयक संजय घरडे, कृषी विद्या विशेषज्ज्ञ हर्षद ठाकूर उपस्थित होते .