लातूर, सोलापूर जिल्ह्यांच्या उत्कृष्ट कामांचा ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ ने सन्मान

नवी दिल्ली : लातूर जिल्ह्यातील ‘आरोग्यवर्धिनी’ आणि सोलापूर जिल्ह्यातील ‘ऑपरेशन परिवर्तन’या नाविन्यपूर्ण उपक्रमांना  आज  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नागरी सेवा दिनी’  ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कारा’ ने गौरविण्यात आले. लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. आणि सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

दरवर्षी 21 एप्रिल हा दिवस ‘नागरी सेवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदाचे हे 16 वे वर्ष आहे. आज विज्ञान भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय प्रशासकीय सुधारणा, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन (DOPT) मंत्रालयांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय प्रशासकीय सुधारणा, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्री डॉ. जितेंद्र सिंग, प्रधानमंत्री सचिवालयाचे सचिव डॉ. पी. के. मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गुबा आणि केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाचे सचिव व्ही.श्रीनिवास हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी देशभरातील 16 प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कारा’ ने गौरव करण्यात आला.

यामध्ये महाराष्ट्रतील लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि 20 लाख रूपये रोख असे आहे.

पुरस्काराने कामात उत्साह आणि समर्पण भावना वाढेल – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

लातूर जिल्ह्याने आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला असून आज प्रधानमंत्री यांच्याहस्ते मिळालेल्या पुरस्काराने संपूर्ण चमूचा उत्साह वाढला असून अधिक समर्पण भावनेने यापुढे सर्व मिळून काम करतील, अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली. या योजनेचा लाभ जवळपास 50 लाख लोकांनी घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

असा आहे आरोग्यवर्धिनी’ उपक्रम

लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या पुढाकाराने आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामार्फत लातूर जिल्ह्यात विविध सेवा दिल्या जातात. आरोग्यदायी जीवनशैलीच्या मार्गदर्शनापासून ते विविध आजारांचे निदान, उपचार संदर्भ सेवा इत्यादींचा त्यामध्ये समावेश आहे.  लातूर जिल्ह्यात 233 आरोग्यवर्धिनी केंद्रामधून आरोग्य सेवा सातत्याने दिल्या जात आहेत. यामध्ये गरोदर माता, बालक, किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयीच्या सेवा, संसर्गजन्य व रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यासारख्या असंसर्गजन्य आजारांवरील उपचार, आपात्कालीन आरोग्य सेवा, कान, नाक, घसा विषयक, मानसिक आजारांवरील सेवा, तसेच आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योगा, आहार, व्यायाम यासारखे विविध उपक्रम यांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यात आरोग्यवर्धिनींच्या सेवा बळकट करण्यासाठी प्रशासनातर्फे निधीची उपलब्धता करुन देणे, औषधांचा पुरवठा, अद्यावत रुग्णवाहिका यासारख्या उपाययोजना, तसेच कर्करोग निदानासाठीचे संजीवनी अभियान, मातामृत्यू रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेला जीवनरेखा कक्ष, लोकांच्या सोयीसाठी गोवोगावी घेतलेली आरोग्य शिबीर आदी नाविण्यपूर्ण उपक्रम आरोग्यवर्धिनीं अंतर्गत  राबविण्यात येतात .

ऑपरेशन परिवर्तन’ मुळे स्थानिकांच्या जीवनमान बदलाचा हा सन्मान – पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे

‘ऑपरेशन परिवर्तन’ मुळे स्थानिकांच्या जीवनमान बदलाचा हा सन्मान असल्याची प्रतिक्रिया पुरस्कार स्वीकारल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली. ते म्हणाले, तत्कालीन  पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा यात सिंहाचा वाटा आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यामध्ये अवैध दारू व्यवसायास आळा बसला व समूळ उच्चाटन झाले. स्थानिक लोकांच्या हाताला स्वंय रोजगाराची साधने उपलब्ध झाल्यामुळे ते अवैद्य दारू विक्रीपासून परावृत्त झाले.

असा आहे ‘ऑपरेशन परिवर्तन’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम

सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने जिल्ह्यामध्ये अवैध दारू व्यवसायावर आळा घालण्याकरीता व त्याचे समूळ उच्चाटनासाठी  ‘ऑपरेशन परिवर्तन’ वर्ष 2021-22 मध्ये  नावीन्यपूर्ण पद्धतीचा उपक्रम सुरू केला. त्यांच्या या उपक्रमास पोलिस यंत्रणेचे सहकार्य आणि स्थानिकांची साथ यामुळे त्यांचे आयुष्य पालटले. या उपक्रमाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील  हातभट्टी  दारू निर्मिती व विक्रीची 117 ठिकाणे निश्चित करुन त्यातील गांवे जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक  अधिकाऱ्यांना दत्तक देण्यात आली. सातत्यपूर्ण कारवाई, समुपदेशन, पुनर्वसन, जागृती या चार टप्प्यावर राबविण्यात आला.

या उपक्रमामध्ये अवैध हातभट्टी व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या या अवैध व्यवसायापासून परावृत्त करुन त्यांना  इतर व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करणे, त्यांना आर्थिक  मदत मिळवून देणे हे मुख्य ध्येय होते.  यादृष्टीने त्यांचे समुपदेशन केले गेले. ज्याचा परिणाम म्हणून 726 व्यक्तींनी स्वत:चा पारंपरिक दारुचा व्यवसाय सोडून देऊन समाजामध्ये ताठ मानेने जगता येण्यासारखे व्यवसाय अंगिकृत केलेले आहेत.  त्यांच्या या कामाची दाखल घेत श्री.सरदेशपांडे त्यांना प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.