भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार आशा भोसले यांना जाहीर

दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंकज उदास, विद्या बालन, प्रसाद ओक यांना

मुंबई,१८  एप्रिल / प्रतिनिधी :-   यंदाचा मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार पद्मविभूषण आशा भोसले यांना दिला जाणार आहे. तर मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार गायक पंकज उदास, अभिनेत्री विद्या बालन, अभिनेते प्रसाद ओक, साहित्य निर्मितीसाठी ‘ग्रंथाली’ प्रकाशन, नाटकासाठी प्रशांत दामले फॅन फाउंडेशनच्या वतीने निर्मिती केलेल्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकासा, समाज सेवेसाठी श्री सद्गुरु सेवा संघ ट्रस्ट या संस्थेला हे पुरस्कार जाहीर झालेले आहेत. गायिका उषा मंगेशकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. यावेळी हृदयनाथ मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, हृदय आर्टसचे संचालक अविनाश प्रभावळकर, संस्थेचे सदस्य रवींद्र जोशी हे उपस्थित होते.

मास्टर दिनानाथजी यांच्या ८१व्या स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन हे पुरस्कार दिले जाणार आहेत. पूर्वी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार जाहीर केले जात होते. गेल्या वर्षापासून त्यांच्या नावाचा पुरस्कार देणे सुरू केले आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार दिला होता.

२४ एप्रिल संध्याकाळी सहा वाजता श्री षण्मुखानंद सरस्वती हॉल येथे हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. मध्यंतरानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रख्यात गायक हरिहरन, डॉ. राहुल देशपांडे यांचा या कार्यक्रमांमध्ये सहभाग असून कथ्थक नृत्याच्या कार्यक्रमात आसामच्या नृत्यांगना मेघरंजनी मेधी, मरामी मेधी यांचा सहभाग असणार आहे. पं. जयप्रकाश मेधी, प. प्रांशू चुरीलाल, विनय मुंढे, शुभम उगले यांचाही यात गायक, वादक कलाकार म्हणून सहभाग आहे. हा कार्यक्रम मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आणि हृदय आर्टस यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर केला जाणार आहे.

अभिनेता प्रसाद ओकने यावरून आपल्या भावना ट्विटवरून व्यक्त केल्या. तो म्हणाला, “ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. या वर्षीचा दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार मला जाहीर झाला. दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानचा आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांचा मी शतशः ऋणी आहे. चंद्रमुखी आणि धर्मवीर टीम तसेच मायबल प्रेक्षकांचे आभार. अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार मी माझ्या बाबांना समर्पित करतो.” आशा भावना त्याने व्यक्त केल्या.