खासगी बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

मुंबईतील गोरेगावमधील वादक पथकावर काळाचा घाला 
मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात

मुंबई,१५  एप्रिल / प्रतिनिधी :-  जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी पहाटे चारच्या सुमारास भीषण अपघात झाला. एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याशिवाय या बसमध्ये एकूण ४० ते ४५ जण प्रवास करत असल्याचीही माहिती मिळाली असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रवाशांपैकी २० ते २५ जण जखमी झाल्याचेही समजते.

बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळल्याची ही घटना घडली.

रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी माध्यमांना सांगितले की, खाजगी बसमध्ये मुंबईतील गोरेगावमधील बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) होते. ते सर्वजण पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात होते. यावेळी ही दुर्घटना घडली.

काही जखमी प्रवाशांना दरीतील बसमधून बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. आणखी प्रवासी बसमध्ये अडकल्याची माहिती मिळत आहेत. बचावपथकांकडून त्यांना बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. दरीत कोसळलेल्या बसमधून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांच्या मदतीला स्थानिक हायकर्स ग्रुप आणि आयआरबी टीम दाखल झाली आहे.

एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची नावे

1) आशिष विजय गुरव, (वय 19), दहिसर मुंबई. 2) यश अनंत सकपाळ, (वय 17) गोरेगाव, मुंबई, 3) जयेश तुकाराम नरळकर (वय 24) कांदिवली, मुंबई, 4) वृषभ रवींद्र कोरमे, (वय 14) गोरेगाव, मुंबई, 5) रुचिका सुनील डुमणे (वय 17), गोरेगाव, मुंबई, 6) आशिष विजय गुरव, (वय १९) दहिसर, मुंबई 7) ओंकार जितेंद्र पवार (वय 25) खोपोली, रायगड 8) संकेत चौधरी (वय 40) गोरेगाव, मुंबई 9) रोशन शेलार (वय 35) मुंबई 10) विशाल अशोक विश्वकर्मा (वय 23) गोरेगाव, मुंबई 11) निखिल संजय पारकर (वय 18) मुंबई 12) युसुफ मुनीर खान (वय 13) मुंबई 13) कोमल बाळकृष्ण चिले (वय 15) सांताक्रुज, मुंबई 14) अभिजीत दत्तात्रेय जोशी (वय 20) गोरेगाव, मुंबई 15) मोहक दिलीप सालप (वय 18) मुंबई 16) दिपक विश्वकर्मा, (वय २०) गोरेगाव 17) सुरेश बाळाराम अरोमुक्कंम (वय १८) गोरेगाव

खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमधील जखमींची नावे

१) नम्रत रघुनाथ गावनुक, (वय १८) गोरेगाव, २) चंद्रकांत महादेव गुडेकर, (वय 29) गोरेगाव, मुंबई ३) तुषार चंद्रकांत गावडे, (वय 22) ४) हर्ष अर्जुन फाळके, (वय 19) विरार ५) महेश हिरामण म्हात्रे, (वय २०) गोरेगाव, मुंबई ६) लवकुश रणजीत कुमार प्रजापति, (वय 16) गोरेगाव, मुंबई ७) शुभम सुभाष गुडेकर, (वय 22) गोरेगाव 8) ओम मनीष कदम, (वय १८) गोरेगाव, मुंबई. 9) मुसेफ मोईन खान, (वय २१) गोरेगाव, मुंबई

खाजगी रुग्णालय, जाकोटिया रुग्णालयातील जखमींची नावे

१) सनी ओमप्रकाश राघव, वय २१ वर्षे, रा. खोपोली, रायगड.

खालापूर रुग्णालयातील मयतांची नावे

१) जुई दिपक सावंत, १८ वर्ष, गोरेगाव, मुबई

अपघातातील जखमींचे मुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन

image.png

नवी मुंबई: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघातातील जखमी आणि त्यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील कामोठे एमजीएम रुग्णालयात प्रत्यक्ष भेट घेवून विचारपूस व त्यांचे सांत्वन केले. जखमींवर योग्य ते उपचार करण्याबाबत सूचना दिल्या.

यावेळी उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, पनवेल महानगर पालिका आयुक्त गणेश देशमुख, एमजीएम रुग्णालयाचे डॉक्टर्स, नर्स आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देश दिले.

या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केली आहे.

अपघातग्रस्त आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर  यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, जखमींच्या आरोग्याबद्दल विचारपूस करत त्यांना दिलासा दिला.

आज पहाटे मुंबई – पुणे जुन्या महामार्गातील बोरघाटात शिंगरोबा मंदिराजवळ एक खाजगी बस दरीत कोसळून दुर्दैवी अपघात झाला. सदर अपघाताच्या प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तिथे सुरु असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला.

यावेळी या बसचा अपघात नक्की कशामुळे घडला त्यामागील कारणे जाणून घेतली. या अपघातानंतर तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना वेळेवर रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करणारे हायकर्स आणि आयआरबी कंपनीच्या रेस्क्यू टीमसोबत देखील यासमयी संवाद साधला.यावेळी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या कुटूंबियांना २ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर

नवी दिल्ली : जुन्या पुणे-मुंबई हायवेवर खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चार वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

या घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे तर जखमींच्या कुटूंबियांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, रायगडच्या बस अपघातात मृत्यू पावल्याची घटना दुर्दैवी आहे. ज्या लोकांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखमी झालेले प्रवासी लवकरात लवकर बरे होतील, अशी आशा आहे.