अयोध्या दौऱ्याच्या टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; नुकसानाची केली पाहणी

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मंत्रीमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय-मुख्यमंत्री शिंदे

नाशिक ​,​१०​ एप्रिल/ प्रतिनिधी :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच अयोध्या दौऱ्यावरून महाराष्ट्रात परत आले. यावेळी विरोधकांनी त्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून सडकून टीका केली. एकीकडे महाराष्ट्रातील शेतकरी अवकाळी पावसामुळे अडचणीत आला असताना मुख्यमंत्री शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर जाणे, कितपत योग्य आहे? असा सवाल विरोधकांनी केला. यानंतर आज महाराष्ट्रात परतल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंनी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे. कारण, आज ते थेट बांधावर पाहणी करण्यासाठी गेल्याचे चित्र दिसून आले.

तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी झाली आहे. शेतकऱ्याला तर अक्षरशः जीव देण्याची वेळ येत आहे. कारण एक तर शेतकरी वर्गाला पिकांचा योग्य भाव मिळत नाही आणि तर दुसरीकडे शेतकरी वर्गावर निसर्ग राजा सुद्धा कोपला आहे. त्यामुळे शेतकऱ्याची सुद्धा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेले नाही तुम्हला नुकसान भरपाई देणार अशी हमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अयोध्या दौऱ्यावरून येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक मध्ये पाहणी केली. तर बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे गावामध्ये बेमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तात्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मंत्रीमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येइल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवून यावेळी शेतकऱ्यांना धीर दिला. बागलाण तालुक्यातील मोसम व करंजाडी खोऱ्यातील करंजाड, भुयाने, निताणे, आखतवाडे, बिजोटे, गोराणे, आनंदपूर, द्याने, उतराने, तर सटाणा, शेमळी, अजमीर सौंदाणे, चौगाव, कर्हे,ब्राह्मणगाव, लखमापुर, आराई, धांद्री आदी गावांत ८ एप्रिल२०२३ रोजी बेमोसमी पाऊस, वादळी वारा, विजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातल्याने उन्हाळी कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तर या निक्सनचे पंचनामे त्वरित काढून त्याची निक्सन भरपाई लवकरात लवकर देण्याचा प्रयत्ने करू असं देखिल एकनाथ शिंदे म्हणाले.