किराडपुरा दंगलीतील आणखी चार आरोपींना पोलिस कोठडी 

छत्रपती संभाजीनगर,६  एप्रिल / प्रतिनिधी :-  किराडपुरा भागात झालेल्या दंगलीतील आणखी चार आरोपींच्‍या विशेष तपास पथकाने मुसक्या आवळल्या. त्‍यांना ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.एस. वानखडे यांनी गुरुवारी दि.६ एप्रिल रोजी दिले.

शहेबाज खान शाहनवाज खान (२७, रा. गल्ली क्रं.६ किराडपुरा), जावेद खान इब्राहिम खान (३४, रा. नेहरुनगर, कटकट गेट), शेख इस्‍माईल शेख इब्राहिम (३८, रा. सेंट्रलनाका रोड, अल्तमश कॉलनी, जसवंतपुरा) आणि सय्यद शकील सय्यद सादेक (३५, रा. मिसारवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.

गुन्‍हा हा गंभीर स्‍वरुपाचा आहे. अटक आरोपींकडून त्‍यांच्‍या साथीदारांची नाव निष्‍पन्‍न होत आहेत, आणखी नावे निष्‍पन्‍न होण्‍याची शक्यता आहे. गुन्‍ह्यात वापरलेले लाठ्या-काठ्या, सळ्या हस्‍तगत करायचे आहेत. त्‍याचप्रमाणे गुन्‍हा करण्‍यासाठी आरोपींना कोणी चिथावणी दिली होती का तसेच गुन्‍हा करण्‍यामागे आरोपींचा नेमका हेतु काय होता याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्‍याची विनंती सहायक सरकारी वकील समीर बेदरे आणि सहायक निरीक्षक अनिल मगरे यांनी न्‍यायालयाकडे केली होती.