प्रणबदांचे बहुआयामी व्यक्तीमत्व सर्वांसाठी मार्गदर्शक – उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रणबदांची कारकीर्द कायम स्मरणात राहणारी – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

मुंबई, दि. 7 : प्रणबदांचे व्यक्तीमत्व हे बहुआयामी असे होते. केंद्रात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. प्रणबदांचे केंद्रीय कॅबिनेटच्या सब कमिटीचे काम आपणा सर्वांसाठीच नेहमी प्रेरणादायी आहे. प्रणबदांची कारकीर्द कायमच स्मरणात राहणारी आहे, अशा शब्दात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तसेच हैद्राबाद मुक्ती संग्रामात सहभाग घेतला होता. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते प्रयत्नशिल होते. पाटबंधारे मंत्री पदाची कारकीर्द कायमस्वरूपी स्मरणात राहणारी अशी होती.

सभागृहाचे माजी सदस्य विजय मुडे, रामनाथ मोते, बलभिमराव देशमुख, युनुस हाजी जैनोद्दिन शेख, जयवंतराव ठाकरे यांच्या निधनाबद्दलही सभापतींनी शोकभावना व्यक्त केल्या.

उद्योग मंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदस्य सर्वश्री शरद रणपिसे, जयंत पाटील, निरंजन डावखरे, सुरेश धस, सदाभाऊ खोत, कपिल पाटील, भाई जगताप आदींनी शोक प्रस्तावावर शोक भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न प्रणब मुखर्जी यांच्या निधनाबाबतचा मांडला शोकप्रस्ताव

माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणब मुखर्जी यांच्या निधनाने देशाने एका महान मुत्सद्दी नेत्याला गमावले आहे. प्रणबदा यांचा विविध विषयात सखोल अभ्यास होता. संकटमोचक असणारे प्रणबदा हे बहुआयामी व्यक्तिमत्च होते, अशा शब्दात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना आदरांजली वाहिली.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्याची मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणब मुखर्जी यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्ताव मांडला.

प्रणब मुखर्जींच्या कामाचा प्रभाव देशावर प्रदीर्घ काळ राहील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विधानसभेत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सदैव राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या प्रणबदा यांनी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून केलेले काम देशासाठी महत्वाचे आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील संरक्षण, अर्थ यासह अनेक महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली, पण अर्थमंत्री म्हणून त्यांची छाप सर्वाधिक राहिली. त्यांचे वाचन अफाट होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना खुला पाठिंबा दिला. प्रणवबाबूंसारख्या विद्वान, अनुभवी व्यक्तीची राष्ट्रपती भवनात गरज आहे, असे शिवसेनाप्रमुखांचे मत होते आणि त्याबाबत प्रणवबाबू नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत. मला सुध्दा त्यांना तीन वेळा भेटण्याची संधी मिळाली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, प्रणबदांबद्दल मॅन फॉर ऑल सिझन असे म्हटले जाऊ शकते. देशाच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, मागील किमान 60 वर्षे प्रणव मुखर्जी राजकारणात सक्रिय होते. इतिहासातले एक महत्वाचे व्यक्तिमत्व म्हणून प्रणबदा यांचे नाव घ्यावे लागेल.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 15 पुस्तके लिहिणारे प्रणबदा हे उत्कृष्ट संसदपटू म्हणून ओळखले जायचे. ते एक कुशल प्रशासक होतेच पण त्याशिवाय त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम करुन आपल्या कामाची छाप सोडली.

जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, परराष्ट्र व्यवहार समिती प्रमुख, आंतरराष्ट्रीय नाणे निधीमधील त्यांचा सहभाग, केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम दिशादर्शक आहे.

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, प्रणबदांची निरीक्षणशक्ती अचाट होती आणि ते कमालीचे हजरजबाबी होते.

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाच दशकाहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले प्रणबदा यांची संकटमोचक अशी ओळख होती. कायदा आणि इतिहास या विषयात पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ प्राध्यापकी आणि पत्रकारिताही केली. कुशल प्रशासक, उत्तम स्मरणशक्ती असलेल्या प्रणबदा यांचा संस्कृतचा गाढा अभ्यास होता. केंद्रीय अर्थ आणि संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम दिशादर्शक ठरले.

उपमुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत मांडला शोकप्रस्ताव

प्रणबदांनी राष्ट्रपतीपदाला न्याय दिलाच परंतु त्यांच्यावर सोपविलेली प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडली. अर्थ, संरक्षण, परराष्ट्र अशी महत्वाची खाती सांभाळली. यातूनच त्यांची क्षमता सिद्ध होते. प्रणबदांचे व्यक्तीमत्व बहुआयामी आणि सर्वांसाठी मार्गदर्शक होते. अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

विधानपरिषदेत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर, माजी विधानपरिषद सदस्य सर्वश्री विजय मुडे, रामनाथ मोते, बलभीमराव देशमुख, युनुस हाजी जैनोद्दिन शेख, जयवंतराव ठाकरे तसेच कोरोना योद्ध्यांना व कोरोना काळात मृत्यु पावलेले नागरिक यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला. तो विधानपरिषदेत सहमत करण्यात आला.

माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ.शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना श्रद्धांजली अर्पण करताना श्री.पवार म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळलेल्या निलंगेकर साहेबांचे निधन आपल्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य, मंत्री, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या विकासासाठी दिलेले योगदान कायम लक्षात राहणारे आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामात त्यांनी योगदान दिले. त्यांचा स्वभाव संघर्षाचा होता. समाजासाठी लढणारे, संघर्ष करणारे नेतृत्व होते. राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी केलेले काम नेहमीच स्मरणात राहील.

सभागृहाचे माजी सदस्य विजय मुडे यांचेही नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण चळवळीत व सर्वसामान्यांसाठी कार्य करणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, असे श्री.पवार म्हणाले. शैक्षणिक विकास, विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रश्नावर ते लढत राहीले. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी त्यांनी संघर्ष केला.

श्री.पवार म्हणाले, सभागृहाचे माजी सदस्य रामनाथ मोते यांच्या निधनाने साधी राहणी, उच्च विचारसरणी असलेले, शिक्षण आणि शिक्षक चळवळीतील एक लढाऊ नेतृत्व आपण गमावले आहे. सर्वसामान्यांपैकी व सामान्यांमध्ये रमणारे ते नेतृत्व होतं. मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या आमदारांपैकी ते होते. ते शिक्षक नेते असल्याने अनेक विषयांचा त्यांचा अभ्यास होता. विधानपरिषदेतील त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण असायची. त्यांच्या निधनाने राज्यातील शिक्षण व शिक्षक चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.

सभागृहाचे माजी सदस्य बलभीमराव देशमुख यांच्याबद्दलही शोकभावना व्यक्त करताना श्री. पवार म्हणाले, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काटीसारख्या छोट्याशा गावात जन्म झालेल्या बी.एन. देशमुख साहेबांनी उच्च आणि सर्वोच्च अशा दोन्ही न्यायालयात वकीली केली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणूनही काम केले. ते विद्वान होते. व्यासंगी होते. कायद्याचे ज्ञान व सामाजिक प्रश्नांची जाण असलेले त्यांचे नेतृत्व होते. शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते सभागृहात आणि न्यायालयाच्या माध्यमातून ते लढत राहिले.

श्री.पवार म्हणाले, सभागृहाचे माजी सदस्य युनुस हाजी जैनोद्दिन शेख यांचे तीन महिन्यापूर्वी निधन झाले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेतून झाली. शेख यांच्या निधनाने सामान्य जनतेचे प्रश्न तळमळीने सोडविणारा नेता हरपला आहे.

सभागृहाचे माजी सदस्य जयवंतराव ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धाजंली अर्पण करताना श्री.पवार म्हणाले, त्यांच्या निधनाने अभ्यासू व्यक्तीमत्व हरवले. नाशिकमधील साहित्य चळवळीशी ते जोडले गेले होते. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात केलेले काम कायम स्मरणात राहील.

कोरोना योद्ध्यांना व नागरिकांना श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, सध्या राज्यात आणि देशात आपण सर्वजण कोरोनाच्या संकटाशी लढत आहोत. या लढाईत आपले, डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशा ताई, पोलीस बांधव, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आणि राज्यातील जनता कोरोना विरुद्धच्या लढाईत आपले योगदान देत आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, लोकांचा जीव वाचविण्यासाठी मागील सहा-सात महिने कोरोना विरुद्ध लढा देत आहे.

कोरोना विरुद्धच्या या लढाईत अनेक कोरोना योद्ध्यांचा मृत्यु झाला आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत मृत्युमुखी पडलेल्या योद्ध्यांना तसेच नागरिकांना श्रद्धाजंली अर्पण करतो. या सर्वांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या एकजुटीतून, सहकार्यातून कोरोनाविरुद्धची लढाई लवकरच जिंकू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.