मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ पत्रकार वि.वि. करमरकर यांना श्रद्धांजली

मुंबई,६ मार्च  /प्रतिनिधी :-मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक,पत्रकार वि.वि.करमरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, दिवंगत करमरकर यांनी क्रीडा जगताला वृत्तपत्रात हक्काचे स्थान मिळवून दिले. त्यांनी वृत्तपत्रांत क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसाठी स्वतंत्र पान सुरू करण्यात पुढाकार घेतला. या अर्थाने ते मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक ठरले.त्यांनी क्रीडा क्षेत्रातील इंग्रजी शब्दांना सोपे आणि लक्षवेधी असे मराठी प्रतिशब्द मिळवून दिले. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. करमरकर यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक, पत्रकार वि.वि. करमरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “ वि. वि. करमरकर यांनी लोकांमध्ये खेळाविषयी प्रेम निर्माण व्हावे यादृष्टीने विविध उपक्रम राबविले. खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे, यासाठी ते आग्रही होते. त्यांच्या प्रेरणेनेच मराठी दैनिकांत क्रीडा पान सुरू झाले. खेळाचे प्रचंड ज्ञान आणि त्यावर नेमक्या शब्दांत भाष्य करण्याची हातोटी यामुळे लोक एखादा सामना पूर्ण बघितल्यानंतरही करमरकर यांनी त्याविषयी काय लिहिले आहे, यासाठी वर्तमानपत्राची वाट बघायचे. त्यांच्या निधनाने एक नवा प्रवाह सुरू करणारा पत्रकार आपण गमावला आहे. त्यांच्या कुटुं‍बियांच्या दुःखात मी सहभागी असून हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर त्यांना देवो, हीच प्रार्थना. ”

ज्येष्ठ पत्रकार वि. वि. करमरकर यांच्या निधनाने मराठी क्रीडा पत्रकारितेचा जनक हरपला – क्रीडामंत्री गिरीष महाजन

मुंबई : ‘मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना वर्तमानपत्रात क्रीडा विशेष पान देणारे आणि म्हणूनच ‘क्रीडा पानाचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचक वि. वि. करमरकर यांच्या निधनाने मराठी क्रीडापत्रकारितेचे जनक हरपले, ’ अशा शब्दांत क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे.

मंत्री श्री महाजन आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ‘करमरकर मूळचे नाशिकचे. त्यांचे वडील डॉक्टर होते. आपल्या मुलानेसुद्धा डॉक्टर व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. पण, एमए करत करमरकरांनी पत्रकारितेची वेगळी वाट निवडली होती. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

क्रीडा संस्था, कार्यकर्ते आणि खेळाडू पुढे जायला हवे, जे कायम टिकू शकेल, याचा त्यांनी सतत ध्यास घेतला. परिणामी राज्यभरात ताकदीच्या क्रीडा संघटना आणि कार्यकर्ते तयार झाले. क्रिकेटसोबत खोखो, कबड्डी, कुस्ती या देशी खेळांना आंतरराष्ट्रीय करण्यात त्या त्या संस्थांसह करमरकर यांच्या मार्गदर्शक लेखणीचा खूप मोठा वाटा आहे. इतर खेळांच्या तुलनेत खोखो हा वेगवान खेळ खूप मागे पडतोय हे लक्षात येताच त्यांनी या खेळाला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. खो खो संस्था, कार्यकर्ते यांना आधार दिला. परिणामी खेळ मोठा होत खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. बँका, रेल्वेची खोखो खेळाडूंना दारे उघडली गेली! दुसऱ्या बाजूला सिझन क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवायची असल्यास त्याचाच ध्यास घेतला पाहिजे. परिणामी टेनिस क्रिकेटला महत्त्व देता कामा नये, यामुळे युवा खेळाडूंचा वेळ, मेहनत वाया जाते. यातून हाती काही लागत नाही. म्हणून त्यांनी कधीच टेनिस क्रिकेटचा फोटो सोडाच, सिंगल बातमी सुद्धा लावली नाही.

क्रीडा पत्रकार हा मैदानावर फिरता असला पाहिजे, याचा आदर्श त्यांनी स्वतः दिवसाचे अनेक तास खर्च करत इतरांसमोर ठेवला. यामुळे करमरकर यांच्या लेखणीला धार होती. प्रसंगी कौतुक करताना त्यांची लेखणी प्रचंड टोकदार होत असे. यातून मग कोणाची सुटका नसे! खेळ आणि खेळाडूंच्या पलीकडची बातमी वाचकांसमोर ठेवताना त्यांनी एक मोठा कॅनव्हास उभा केला होता, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, ‘असे श्री. महाजन यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

आद्य क्रीडा पत्रकार हरपला – सुधीर मुनगंटीवार यांची वि.वि. करमरकर यांना श्रद्धांजली

चंद्रपूर,६ मार्च  / प्रतिनिधी :- “वि.वि. करमरकर यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेतील आद्य क्रीडा पत्रकार आणि एक चांगला क्रीडा समीक्षक हरपला आहे,” अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वि.वि. करमरकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

टीव्ही नसलेल्या काळात त्यांची क्रीडा वार्तापत्रे गावोगावी लोकप्रिय होती, ती अजूनही लक्षात आहेत, असे सांगून श्री.मुनगंटीवार म्हणाले की, मराठी पत्रकारितेत क्रीडा क्षेत्राला महत्त्व मिळवून देण्यात वि.वि. करमरकर यांचा सिंहाचा वाटा आहे. ज्या काळात मराठी पत्रकारितेत क्रीडा क्षेत्र दुर्लक्षित होते, तेव्हा वि.वि. करमरकर यांची महाराष्ट्र टाइम्सच्या शेवटच्या पानावर प्रकाशित होणारी क्रीडा वार्तापत्रे इतकी लोकप्रिय झाली की अन्य मराठी वर्तमानपत्रांनी क्रीडा विषयक पान सुरू केले. वि.वि. करमरकरांचे वैशिष्ट्य हे की ते क्रिकेटपुरते थांबले नाहीत तर इतर सर्व खेळांनाही त्यांनी वृत्तपत्रात तितकेच महत्त्व प्राप्त करून दिले, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

वि.वि. करमरकरांची आकाशवाणीवरील क्रीडा समालोचनही तितकेच लोकप्रिय झाले होते, असे सांगून मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, क्रीडा पत्रकारितेला मराठी वृत्तपत्र सृष्टीत करमरकरांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. स्वतः समाजवादी असले तरी क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या पत्रकारितेपासून त्यांचे राजकीय विचार वेगळे राखण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज वि.वि. करमरकरांच्या मृत्यूने आपण एक समर्पित क्रीडा समालोचक गमावला आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबीय व चाहत्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, अशी प्रार्थनाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केली आहे.