मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना निरोप

राज्यपालांना नौदलातर्फे मानवंदना; नव्या राज्यपालांचा शपथविधी शनिवारी

मुंबई ,१७ फेब्रुवारी /प्रतिनिधी :-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे मावळते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे निरोप भेट घेतली. यावेळी उभयतांनी राज्यपालांना पुढील वाटचालीसाठी व आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी  शुभेच्छा दिल्या.

राज्यपालांना नौदलातर्फे मानवंदना

मावळते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर व इतर अधिकारी उपस्थित होते.विमानतळाकडे प्रस्थान करण्यापूर्वी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचे आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सपत्नीक आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवारी दुपारी १२.४० वाजता राजभवन येथे शपथ घेणार आहेत.

यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर आदी मान्यवरांनीही श्री. बैस यांचे स्वागत केले.