एसटी कर्मचाऱ्यांचा जानेवारीचा पगार रखडला!

परिवहन खाते आणि अर्थ खात्यामध्ये बेबनाव असल्यामुळे अर्थ खात्याकडून कोंडी होत असल्याचा आरोप

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले परिवहन खाते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या अर्थ खात्यामध्ये बेबनाव असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारवर अवलंबून असलेल्या महामंडळाची अर्थ विभागाकडून कोंडी होताना दिसते आहे. अर्थ विभागाकडून आतापर्यंत सरकारने दिलेल्या निधीचे विवरण सादर करण्याचे एसटी महामंडळाला सांगितले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्यातील पगार रखडला असून आणखी काही काळ तो लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

एसटी महामंडळाकडून पगारासाठी अर्थ विभागाकडे थकीत असलेल्या एक हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. दर महिन्याला कर्मचाऱ्यांना पगारासाठी ३६० कोटी रुपये मिळायला हवेत. मात्र प्रत्यक्षात तेवढी रक्कम दरमहा मिळत नसल्याने महामंडळाकडून अर्थ विभागाला एक पत्र लिहित थकीत रक्कम मागितली होती.

मात्र अर्थ विभागाकडून एसटी महामंडळाला आधी दिलेल्या रकमेचा हिशोब देण्यास सांगितले आहे. यासंदर्भात १६ फेब्रुवारी रोजी अर्थ, परिवहन आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडणार आहे. एसटी आंदोलनावेळी दर महिन्याला ७ ते १० तारखेमध्ये पगार करण्याचे आश्वासन सरकारने कोर्टात दिले होते. मात्र दर महिन्यात पगाराला उशीर होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी बघायला मिळत आहे. अशात आता पगाराचे भविष्यच विवरणावर अवलंबून असल्याने कर्मचारी पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.

जानेवारी महिन्यात १९ तारखेला एसटी महामंडळाने मागील सहा महिन्यांच्या वेतन रकमेतील थकीत रकमेसह या महिन्याच्या वेतनासाठी १०१८.५० कोटी रुपयांची मागणी लेखी पत्राद्वारे राज्य सरकारच्या अर्थ खात्याकडे केली होती पण त्याला आता एक महिना होत आला तरीही सरकारकडून निधी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. आता अजून काही दिवस वेतन लांबेल अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.