मराठी व्यवहारातील ज्ञानभाषा होणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्धा ,५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-मराठी ज्ञानभाषा आहेच. मात्र, आता सगळ्या प्रकारचे शिक्षण मराठीतून मिळेल. परिणामी मराठी व्यवहारातील ज्ञानभाषा होईल. त्यामुळे मराठीबाबत व्यक्त होत असलेली चिंता पुढे राहणार नाही, असा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वर्धा येथील महात्मा गांधी साहित्य नगरीत सुरु असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी झालेल्या शुभारंभाच्या सत्रात ते बोलत होते.

याप्रसंगी खासदार रामदास तडस व डॉ. अनिल बोंडे, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावर, आमदार समीर मेघे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे तसेच प्रदीप दाते व सागर मेघे उपस्थित होते.देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या शैक्षणिक धोरणात भाषांना नवी दिशा देण्याचे सामर्थ्य आहे. तसेच या वेळी उपमुख्यांनी शताब्दी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघास दहा कोटी रुपये राज्य शासनातर्फे देण्याचेही जाहीर केले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले त्यांच्याच शब्दांत…  

महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या नगरीत, देशाला रामराज्य आणि सुशासनाचा मार्ग दाखविणाऱ्या नगरीत अर्थात वर्धा येथे आयोजित 96 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहून साहित्य आणि मराठी प्रेमींशी संवाद साधण्याचा योग आज आला.

विदर्भाच्या मातीने अनेक थोर साहित्यिक देशाला आणि मराठीला दिले. विदर्भ साहित्य संघ आपली शताब्दी साजरी करीत असताना हे संमेलन विदर्भात होते आहे, हा एक अतिशय चांगला योग आहे. मराठी आणि साहित्यसेवेसाठी विदर्भ साहित्य संघाला शताब्दीनिमित्त ₹10 कोटींची देणगी यावेळी जाहीर केली.

आज नवमाध्यमांमुळे अनेक नव-साहित्यिक अभिव्यक्ती करताना दिसून येतात. त्यात उंची आणि खोलीचा अभाव असला तरी हा अभिसरणाचा काळ आहे. येणाऱ्या काळात त्यात निश्चितपणे बदल होतील. एक मात्र नक्की की, पुस्तकांची सर कशालाच नाही!

स्थित्यंतरातून नवीन मूल्य जन्माला येत असतात. मात्र काही शाश्वत मूल्ये चिरंतन महत्वाची असतात. ती जपली पाहिजेत.

मराठी भाषेत सर्वाधिक साहित्य संमेलने होतात. ही परंपरा वैशिष्ट्यपूर्ण आहे. मराठीचे हे वेगळेपण आहे.

त्याचवेळी मराठीला ज्ञानभाषा करू शकलो नाही, हे अपयश आपण मान्य केले पाहिजे. शिक्षणात इंग्रजीचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला. पण आता आपले मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नव्या शिक्षण धोरणामुळे प्रादेशिक भाषांमध्ये ज्ञानशिक्षणाची सुविधा असणार आहे. त्याचा निश्चितच मोठा लाभ मराठी भाषेला सुद्धा होईल.

साहित्य संमेलन हे उणिवेवर बोट ठेवण्यासाठी नाही, तर जाणिवा समृद्ध करण्यासाठी असते, हीच माझी ठाम धारणा आहे. त्यामुळे ही परंपरा मोलाची आहे. सर्व साहित्यिकांना, मराठीवर निस्सीम प्रेम करणाऱ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा!

विदर्भ साहित्य संघाच्या ‘वरदा’ या स्मरणिकेचे याप्रसंगी प्रकाशन केले. यावेळी साहित्य महामंडळाच्या उषाताई तांबे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप दाते, विनय सहस्रबुद्धे, खा. रामदास तडस, खा. डॉ. अनिल बोंडे, आ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. समीर मेघे, सागर मेघे आदी उपस्थित होते.