१९ वर्षांखालील भारतीय महिला संघाने रचला इतिहास; बलाढ्य इंग्लंडला धूळ चारत मिळवले विश्वजेतेपद

पॉचेफस्ट्रूम-दक्षिण आफ्रिकेत झालेल्या १९ वर्षांखालील महिला टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इतिहास रचला. भारतीय महिला संघाने इंग्लड संघाला ७ विकेट्सने मात केली आणि हा विश्वचषक आपल्या नावावर केला. शेफाली वर्माच्या नेतृत्त्वात या संघाने स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी करत अंतिम सामना गाठला. उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला धूळ चारल्यानंतर या संघाकडून भारतीयांचा अपेक्षा वाढल्या होत्या. या संघाने या अपेक्षा सार्थकी ठरवत या वर्षाचा पहिला विश्वचषक जिंकला.

या सामन्यात भारतीय महिला संघातील गोलंदाजीने इंग्लडच्या संघाची दाणादाण उडवली. इंग्लडच्या संपूर्ण संघाला ६८ धावांमध्ये गारद केले. तीतस साधूने गोलंदाजी करत ४ षटकांत केवळ ६ धावा २ विकेट्स काढल्या. तर, अर्चना देवी, पार्शवी चोप्रा यांनीही प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. तर, मन्नत कश्यप, शेफाली वर्मा आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी १ विकेट काढल्या. तर, ६९ धावांचा पाठलाग करताना कर्णधार शेफाली वर्माने सुरुवात तर धडाकेबाज केली. मात्र, ११ चेंडूंमध्ये १५ धावा करत बाद झाली. यामध्ये तिने १ चौकार आणि १ षटकार मारला. भारताची स्थिती २० वर २ असताना सौम्या तिवारी आणि गोंगाडी त्रिशा या दोघींनी चांगली भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला. त्रिशाने २४ धावा केल्या आणि तिवारी २४ धावांवर नाबाद राहिली.

गोलंदाजी, क्षेत्ररक्षणात चमकदार खेळ करताना भारताच्या मुलींनी  इंग्लंडची घसरगुंडी उडवली. तितास संधू, अर्चना देवी व पार्श्वी चोप्रा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत इंग्लंडच्या मुलींच्या संघाची वाईट अवस्था केली. इंग्लंडचा संघ ६८ धावांत तंबूत परतला. 

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर अवघे ६९ धावांचे  माफक लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडच्या फलंदाजीची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात अवघ्या एका धावेवर त्यांनी लिबर्टी हीपच्या स्वरुपात पहिली विकेट गमावली. त्यानंतर कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्स हिला देखील भारतीय गोलंदाजीचा सामना करणे अवघड झाले तिने केवळ ४ धावा केल्या. पहिल्या १० षटकात केवळ ३९ धावांत इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला होता. नियाम फिओना हॉलंड १० (८), रायना मॅकडोनाल्ड गे १९ (२४), अलेक्सा स्टोनहाउस ११(२५) आणि सोफिया स्मेल ११(७) वगळता कोणालाही दोनआकडी धावसंख्या गाठता आली नाही. भारतीय महिला गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. तीतस साधू, अर्चना देवी आणि पार्शवी चोप्रा यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या . तर मन्नत कश्यप, सोनम यादव आणि कर्णधार अष्टपैलू शफाली वर्मा यांना प्रत्येकी १ विकेट घेतली.  

भारतीय संघासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचे बक्षिस 

या पहिल्यावहिल्या विजयासाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. त्यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात की, “भारतातील महिला क्रिकेटची प्रगती होत आहे आणि या विश्वचषक विजयाने महिला क्रिकेटचा दर्जा काही अंशांनी उंचावला आहे. संपूर्ण टीम आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षीस रक्कम म्हणून ५ कोटी रुपये जाहीर करताना मला आनंद होत आहे. हे निश्चितच नव्या वाटा निर्माण करणारे वर्ष आहे.”

विश्वविजेत्या संघाचा होणार भव्य सत्कार! 

भारतीय महिलाच्या अंडर-१९ विश्वचषकातील विजयी कामगिरी नंतर त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यात ते म्हणतात,”मी शफाली वर्मा आणि तिच्या विजयी संघाला आमंत्रित करतो. ती आणि तिचा विजयी संघ आमच्यासोबत नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे सहभागी होईल आणि १ फेब्रुवारी रोजी तिसऱ्या टी२० चे साक्षीदार होईल. ही अतुलनीय कामगिरी साजरी करण्यासाठी निश्चितच उत्सवाची गरज आहे.”