राष्ट्रीय पातळीवरील सुब्रोतो कप फुटबॉल स्पर्धेमध्ये औरंगाबाद येथील केंद्रीय विद्यालयाच्या महिला फुटबॉल संघाची निवड

औरंगाबाद,२४ जुलै /प्रतिनिधी :- नाशिक आणि पुणे येथे पार पडलेल्या केंद्रीय विद्यालय संगठनच्या विभागीय स्तरावरील औरंगाबाद येथील केंद्रीय विद्यालयाच्या १४ वर्षाखालील व १७ वर्षाखालील महिला फुटबॉल संघाने उत्कृष्ट कामगिरी करत थेट केंद्रीय विद्यालयच्या राष्ट्रीय पातळीवरील सुब्रोतो कप फुटबॉल स्पर्धेत करिता पात्र होण्यास यशस्वी ठरल्या आहेत. या स्पर्धेतील  सामने खेळण्याकरीता दोन्ही टीम दिनांक २३ जुलै २०२२ रोजी दुपारी १:३० वाजता देहरादून करीता रवाना झाल्या असून दि. २५ तारखेपासून केंद्रीय विद्यालयच्या राष्ट्रीय सुब्रोतो कप फुटबॉल स्पर्धेची सुरवात होणार आहे.

एन आर सी नाशिक आणि एयर फोर्स स्टेशन लोहेगाव, पुणे येथे पार पडलेल्या केंद्रीय विद्यालय संगठन नॅशनल सुब्रोतो कप फुटबॉल महिलाच्या विभागीय स्तरावरील महिला फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षाखालील व १७ वर्षाखालील दोनही महिला संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले.

मुलींच्या १४ वर्षाखालील वयोगटातील अंतिम फेरीत अनुष्का पाटील हिने केलेल्या दोन गोलांच्या बळावर केंद्रीय विद्यालय औरंगाबाद महिला संघाने के.व्ही. आय आय टी पुणे संघावर २-० गोलने मात करीत विजेतेपद पटकावले. मुलींच्या १७ वर्षाखालील वयोगटातील अंतिम फेरीत प्रगति ठुबे, पल्लवी जगताप व पायल शंभरकर ह्यांनी प्रत्येकी केलेल्या एक गोलांच्या बळावर केंद्रीय विद्यालय औरंगाबाद महिला संघाने के.व्ही. एयर फोर्स स्टेशन पुणे संघावर ३-० गोलने मात करीत चैम्पियन्सचा बहुमान पटकावला. केंद्रीय विद्यालय औरंगाबादच्या १४ वर्षाखालील व १७ वर्षाखालील दोन्ही महिला संघांनी उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत थेट केंद्रीय विद्यालय संगठन नॅशनल सुब्रोतो कप फुटबॉल महिला नॅशनल्स पर्यंत मजल मारली आहे.

महिला खेळाडूंचे कार्यवाहक प्राचार्य श्रीमती ममता रानी सह सर्वच शैक्षणिक स्तरातून भरभरून कौतुक केले जात आहेत.  महिला संघांना नॅशनल करीता कोचिंग देऊन तयार करण्याकरीता श्री मनोहर कुलकर्णी, श्री सुरेश बनकर, श्री सौरभ व श्री रहीम खान यांनी परिश्रम घेतले.