राज्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ जानेवारीपासून 

मुंबई ,१३ जानेवारी  / प्रतिनिधी :- मराठी भाषा संवर्धन पंधरवडा राज्यभर साजरा करावा, अशा सूचना मराठी भाषा विभागाने एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खासगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये इ. संस्थांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो.

            मराठी भाषेचा प्रचार व प्रसार या विभागाच्या मुख्य धोरणास अनुसरुन ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात येतात. त्यानुसार यावर्षीदेखील मराठी भाषेसंदर्भातील विविध कार्यक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये आयोजित करण्यासाठी मराठी भाषा विभागाने सर्व कार्यालयांना सूचना दिल्या आहेत.

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त राजधानीत विविध उपक्रम

नवी दिल्ली, १३ : ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने राजधानी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये ट्विटर मोहिम, लघुपट, मराठी चित्रपट, मराठी भाषेच्या महतीवर आधारित व्याख्याने, ग्रंथ प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा असे कार्यक्रम होणार आहेत.

मराठी भाषा विभागाच्या सूचनेनुसार १४ ते २८ जानेवारी दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’चे राज्यात व राज्याबाहेरील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये आयोजन करण्यात येते. यावर्षी महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

मराठी भाषेवर आधारित विविध उपक्रम

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवरून १४ ते २८ जानेवारीपर्यंत मराठी भाषेशी संबंधित सुविचार देण्यात येतील. यासह मान्यवर कवी त्यांच्या स्व-लिखित कविता सादर करतील या कविता परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवरून दररोज प्रसारित केल्या जातील.

मराठी भाषेची म‍हती सांगणारे लघुपट, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपट समाज माध्यमांव्दारे तसेच कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात प्रक्षेपित करण्यात येणार आहेत.

२१ आणि २२ जानेवारी रोजी  नवीन महाराष्ट्र सदनातील प्रांगणात ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यामध्ये रसिक प्रकाशन, पॉप्युलर प्रकाशन, संस्कृती प्रकाशन, आदी प्रकाशन संस्था पुस्तक विक्री प्रदर्शन लावणार आहेत.

यासह कॅनडा दूतावासातील वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अर्चना मिरजकर यांचे ‘साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली’ या विषयावर व्याख्यानाचे प्रसारण केले जाईल. नूतन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेता विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र दिले जाईल.

समाज माध्यमांहून प्रसारण होणार

मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त कविता, लघुपट, व्याख्याने, परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल, फेसबुक, युट्यूब चॅनेलहून प्रसारीत होणार आहे. अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परिचय केंद्राव्दारे  करण्यात आले आहे.