महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई ,२९ डिसेंबर / प्रतिनिधी :-भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र  विधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघ आणि तीन शिक्षक मतदारसंघ अशा एकूण पाच मतदार संघांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. नाशिक व अमरावती विभाग पदवीधर तसेच कोकण, औरंगाबाद आणि नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी  ही निवडणूक ३० जानेवारी २०२३ राेजी होणार आहे. आजपासून या निवडणुकीची आचारसंहिता संबंधित पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात लागू करण्यात आली आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

गुरुवार दि. ५ जानेवारी  २०२३ रोजी या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. गुरुवार दि. १२ जानेवारी २०२३ ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. शुक्रवार  दि. १३ जानेवारी २०२३ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल, सोमवार दि. १६ जानेवारी २०२३ ही नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख असेल. सोमवार दि. ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून गुरुवार दि. २ फेब्रुवारी २०२३ रोजी मतमोजणी होईल.

सर्वश्री डॉ. सुधीर तांबे (नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ), डॉ. रणजित पाटील (अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ), श्री.विक्रम काळे (औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ), श्री.नागोराव गाणार (नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ), श्री. बाळाराम पाटील (कोकण विभाग शिक्षक मतदार संघ) हे विधानपरिषद सदस्य ७ फेब्रुवारी २०२३ रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या या पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

मराठवाड्यात आचारसंहिता लागू! शिक्षक मतदारसंघासाठी 30 जानेवारीला मतदान

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची अखेर घोषणा झाली असून, मराठवाड्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.  मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणूक जाहीर झाली असून, उमेदवारी 12 जानेवारीपासून भरता येणार आहे. तर मतदान 30 जानेवारी पार पडणार आहे. तसेच मतमोजणी 2 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. विद्यमान आमदार विक्रम काळे यांचा कार्यकाळ 7  फेब्रुवारीपर्यंत असल्याने तत्पूर्वी निवडणुक प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन आमदार निवडण्यात येणार आहे. 5 जानेवारीला निवडणुकीची अधिसूचना जरी करण्यात येणार आहे. 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 13 जानेवारीला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. 16 जानेवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे. 30 जानेवारीला मतदान होणार आहे. तसेच 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

विधान परिषदेच्या निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप

नागपूर : विधान परिषद सभागृहातून येत्या ७ फेब्रुवारी २०२३ रोजी  निवृत्त होणाऱ्या सर्वश्री विक्रम काळे (औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ), डॉ.सुधीर तांबे (नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ), डॉ.रणजित पाटील (अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ), नागोराव गाणार (नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ), बाळाराम पाटील (कोकण विभाग शिक्षक मतदार संघ)  या पाच विधान परिषद सदस्यांना आज सभागृहात निरोप देण्यात आला.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या संसदीय आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. त्याचप्रमाणे त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी निवृत्त होणाऱ्या सदस्यांनीही आपल्या भावना व्यक्त करून सभागृहाचे आभार मानले.