इफ्फी 52 च्या उद्घाटन सोहळ्यात हंगेरियन चित्रपटनिर्माते इस्तेवान साबो यांचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

सत्यजित रे यांचा तेजस्वी करिष्मा कायम माझ्या स्मृतिपटलावर कोरलेला : इस्तेवान साबो

पणजी,२१ नोव्हेंबर /प्रतिनिधी :-52 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव –इफ्फिचा उद्घाटन सोहळा आज (20 नोव्हेंबर 2021) गोव्याची राजधानी पणजी इथे झाला, या सोहळ्यात सुप्रसिद्ध हंगेरियन चित्रपट निर्माते इस्तेवान साबो,यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जागतिक सिनेमामध्ये अतुलनीय सहभागाबद्द्ल 52 व्या इफ्फीमध्ये इस्तेवान साबो यांना हा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे. आज सुरु झालेला हा महोत्सव 28 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे.

विलक्षण प्रतिभा लाभलेले इस्तेवान साबोयांचा 1981 साली आलेला पहिलाच चित्रपट, ‘मेफिस्तो’ला जगभरातील चित्रपट रसिक आणि समीक्षकांची पसंती मिळाली होती. एवढेच नाही, तर सर्वोत्तम परदेशी भाषिक चित्रपटांच्या स्पर्धेत, पहिला ऑस्कर म्हणजेच अकादमी पुरस्कार मिळवणारा हा पहिलाच हंगेरियन चित्रपट ठरला. भाषेची बंधने ओलांडून, हा चित्रपट जगभरात पोहोचला आणि जगभारातल्या चित्रपट रसिकांच्या काळजाला त्याने हात घातला.

या पुरस्काराबद्द्ल व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून, आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना, इस्तेवान साबो म्हणाले, “भारतीयांना माझे चित्रपट माहिती आहे, एवढंच नाही, तर त्यांना माझे चित्रपट माहिती आहेत, हे समजल्याने मी हेलावून गेलो आहे.”

सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आभार व्यक्त करतांना,इस्तेवान साबो यांनी, ज्येष्ठ चित्रपट निर्माते, सत्यजित रे यांच्याशी झालेल्या भेटीबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. 30 वर्षांपूर्वी तेव्हाच्या मद्रास इथे ही भेट झाली होती. “ रे यांनी मला आणि माझ्या पत्नीला भोजनाचे आमंत्रण दिले होते. त्यावेळी आमच्यात त्यांच्या चित्रपटांविषयी आणि चित्रपट-निर्मिती विषयी, एकूणच या व्यवसायाविषयी अत्यंत दर्जेदार चर्चा झाली. ही सर्वंकष चर्चा माझ्यासाठी कायम अविस्मरणीय असेल.”

आपल्या जुन्या मित्राच्या नावाने पुरस्कार दिल्याबद्दल इफ्फिचे आभार मानताना इस्तेवान साबो म्हणाले, “ रे यांचा तेजस्वी चेहरा आणि करिश्मा माझ्या कायम स्मरणात राहील.”

हॉलिवूड चित्रपट निर्माते मार्टिन स्कॉरसेसी यांना देखील आज 52 व्या  इफफी उद्घाटन सोहळ्यात सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

सत्यजित रे हे आधुनिक चित्रपट सृष्टीची पायाभरणी करणाऱ्यांपैकी एक होते आणि जगभरातल्या चित्रपट चाहत्यांसाठी पूजनीय आहेत. त्यांच्या ‘द अपू’ ही चित्रपट त्रिवेणी  आणि ‘द म्युझिक रूम’ या कलाकृतींनी भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात त्यांची जागा घट्ट  केली. या कलाकृती आजही तेवढ्याच लोकप्रिय आहेत.

सत्यजित रे आजही चित्रपट क्षेत्रातील कोट्यवधी कलाकारांसाठी आशेचा किरण आणि कल्पनांचा प्रेरणास्रोत आहे. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि महान चित्रपट निर्माता दिग्दर्शकाचं जन्म शताब्दी वर्ष साजरे करत आहोत, त्यामुळे असं निर्णय घेण्यात आला आहे, की यापुढे इफ्फीचा जीवन गौरव पुरस्कार यापुढे सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार म्हणून ओळखला जाईल.