राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजभवन येथील सचिवालयाचे उद्घाटन

मुंबई ,१६ डिसेंबर / प्रतिनिधी :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आज दुपारी राज्यपालांच्या सचिवालयाचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उद्धाटनानंतर सचिवालयाची पाहणी उपस्थित मान्यवरांनी केली. इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारी यांचेसह संपूर्ण इमारतीची पाहणी केली.

मुख्यमंत्री यांनी घेतली राज्यपाल यांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रत्नागिरीचा दौरा नियोजित असल्यामुळे त्यांनी सकाळीच राजभवन येथे जाऊन राज्यपालांसह नव्या सचिवालय इमारतीची  पाहणी केली. मुख्यमंत्र्यांसोबत बंदरे व खाणकाम मंत्री दादाजी भुसे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते.

पर्यावरण स्नेही इमारत

पर्यावरण स्नेही हरित इमारत असलेल्या या सचिवालयामध्ये राज्यपालांचे प्रधान सचिव, राज्यपालांचे परिवार प्रबंधक, सहसचिव, उपसचिव यांची कार्यालये असतील तसेच राजभवन सचिवालयातील प्रशासन शाखा, शिक्षण शाखा, आदिवासी कक्ष, वैधानिक विकास मंडळ आदी शाखांची कार्यालये असतील.

सचिवालय इमारतीमध्ये बैठकांसाठी छोटे सभागृह, ग्रंथालय तसेच अभिलेख जतन कक्ष देखील बांधण्यात आले आहे. यापूर्वीची राज्यपालांच्या सचिवालयाची इमारत सर्वप्रथम सन १९१२ मध्ये बांधण्यात आली होती. तीन वर्षांपूर्वी जुनी इमारत पाडून त्याच जागेवर नवीन इमारत बांधण्याचा निर्णय करण्यात आला. नव्या सचिवालय इमारतीमध्ये तळघर, तळमजला व पहिला मजला आहे.

जुन्या सचिवालय इमारतीचे बांधकाम क्षेत्रफळ ४५७.८४ चौमी होते, तर नविन सचिवालय इमारतीचे एकूण क्षेत्रफळ २२८६.०० चौमी आहे.

इमारतीच्या बांधकामासाठी हरित इमारतीचे नियम पाळण्यात आले आहे. इमारतीमध्ये ३० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प अंतर्भुत केलेला आहे त्यामुळे दर महिन्याला ३५०० युनिट ऊर्जेची बचत होणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी व सहसचिव श्वेता सिंघल तसेच राजभवन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.