प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नागपूरमध्ये समृद्धी महामार्ग, एम्स, मेट्रोसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण

नागपूर ,१० डिसेंबर / प्रतिनिधी :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी  (दि.११) नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण, नागपूर ते बिलासपूर या वंदेभारत रेल्वेचा शुभारंभ, मेट्रो प्रकल्प टप्पा एकचे लोकार्पण तर दुसऱ्या टप्प्याची सुरुवात, नाग नदी प्रदूषण निर्मूलनाचा शुभारंभ करतील तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था राष्ट्राला समर्पित करणार आहेत.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे. प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून पोलिसांचा चोख बंदोस्त तैनात करण्यात आला आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे,  सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यानंतर ते थेट ‘वंदे भारत एक्सप्रेस’चे उद्घाटन करण्यासाठी प्रस्थान करतील. नागपूर ते बिलासपूर या देशातील सहाव्या वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे.  वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागपूर ते बिलासपूर हे अंतर अवघ्या सहा ते साडे सहा तासात गाठता येणे शक्य होणार आहे. सध्या हे अंतर कापण्यास 7 ते 8 तास लागतात. दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेतर्फे ही गाडी चालवली जाणार आहे. 16 कोच असणाऱ्या या गाडीची आसनक्षमता 1 हजार 128 आहे.  नागपूर ते बिलासपूरदरम्यान या गाडीला फक्त गोंदिया दुर्ग व रायपूर येथेच थांबा देण्यात आला आहे.

प्रधानमंत्री रेल्वे स्टेशवरून झिरो माईल जवळील फ्रीडम पार्क येथील कार्यक्रमाला उपस्थितीत राहतील.  त्यांच्या हस्ते नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होईल. या प्रकल्पाची एकूण लांबी ४० किलोमीटर असून एकूण खर्च ९ हजार २७९ कोटी रुपये आहे. प्रवासी क्षमता १ लाख ५० असणार आहे. त्याचबरोबर नागपूर मेट्रो दोन या प्रकल्पाचा शुभारंभ त्यांचा हस्ते होईल. नागपूर मेट्रो-२ हा एकूण ६ हजार ७०८ कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. त्याअंतर्गत ४३८ किलोमीटरची मेट्रो लाईन तयार केली जाणार आहे. हा प्रकल्प पाच वर्षात म्हणजे २०२८ पर्यत पूर्ण होईल. खापरीला बुटीबोरी एमआयडीसी (१८.६ कि.मी. ) ऑटोमोटिव्ह चौकाला कन्हान (१३ किमी ) प्रजापतीनगरला कापसी (५.५ कि.मी.) तर लोकमान्यनगरला हिंगणा(६.७ कि.मी.) शहराशी जोडले जाईल.

प्रधानमंत्री त्यानंतर फ्रीडम पार्क येथून मेट्रोने खापरीला रवाना होतील. प्रवासादरम्यान विविध वर्गातील नागरिक, महिला व मुलांशी ते संवाद साधतील. खापरीला पोहोचल्यावर वाहनाने समृद्धी महामार्गाच्या झिरो पॅाईंट येथे पोहोचतील. संपूर्ण राज्यासाठी भाग्यरेखा ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ७२० किलोमीटरच्या अत्यंत महत्वाकांक्षी महामार्गाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. या रस्त्यावरून ते दहा किलोमीटर वाहनाने प्रवास करणार आहेत.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) टेंपल ग्राऊंड येथे प्रधानमंत्री यांची जाहीर सभा होणार आहे. १४ एप्रिल २०१७ रोजी प्रधानमंत्री महोदयांनी या संस्थेचे भूमिपूजन केले होते. उद्या राष्ट्राला ही संस्था समर्पित करण्यात येणार आहे. मध्य भारतातील सर्व सुविधायुक्त ही आरोग्यसंस्था असून निर्मितीसाठी सुमारे १ हजार ५७७ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. याच कार्यक्रमादरम्यान सिपेट – सेंटर फॅार स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट (सीएसटीएस) चंद्रपूरचे आनलाईन लोकार्पण करण्यात येणार आहे.  राज्य शासनाने या संस्थेसाठी 15 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. सर्व सोईसुविधांनी युक्त ही संस्था आहे. यासोबतच नागपुरात होणाऱ्या नॅशनल इंस्टिट्यूट फॅार वन हेल्थ या संस्थेचा शुभारंभ करण्यात येईल. तसेच सेंटर फॅार रिसर्च, मॅनेजमेंट अँड कंट्रोल आफ हेमोग्लोबिनोपॅथिस या चंद्रपूरच्या संस्थेची आनलाईन पद्धतीने उदघाटन करतील. कार्यक्रमादरम्यान या संस्थांचे माहितीपट दाखविण्यात येणार आहेत.

कार्यक्रम संपल्यानंतर प्रधानमंत्री पुढील कार्यक्रमासाठी गोव्याकडे प्रस्थान करतील.