हर घर जल ही महत्त्वपूर्ण योजना असून त्यातील त्रुटी दूर करून कामे सुरू केली जावी –बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे

बीड, ७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- प्रत्येक गाव व घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचविण्यासाठी “हर घर जल” योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वपूर्ण योजना आहे. यासाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करून दिला जात असल्याने यातील त्रुटी दूर करून सदर कामे सुरू केली जावीत. सन 2024 पर्यंत योजना पूर्ण करण्यात  यावी असे आदेश राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

पालकमंत्री अतुल सावे बीड जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणी बाबत आढावा बैठक संपन्न झाली. याप्रसंगी ते बोलत होते बैठकीस आमदार लक्ष्मण पवार आमदार सुरेश धस जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके  तसेच श्री.अक्षय मुंदडा श्री.राजेंद्र मस्के व विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.सावे म्हणाले, शिवभोजन केंद्र नागरिकांच्या सोयीसाठी निश्चित वेळेत सुरू राहिले पाहिजेत. तसेच तेथे योजनेबाबत माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावले जावेत.तेथे सीसीटीव्ही यंत्रणा असावी तसेच शासनाच्या सूचनानुसार सुविधा व अंमलबजावणी व्हावी. संबंधित अधिकाऱ्यांनी शिवभोजन केंद्रांना भेटी देऊन तपासणी केली पाहिजे जेणेकरून नागरिकांना या योजनेचा चांगला लाभ मिळू शकेल, असे पालकमंत्री अतुल सावे यांनी याप्रसंगी सुचित केले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी विहित पद्धतीने कामे होण्याचा दृष्टीने यंत्रणातील अधिकारी यांना सूचना केल्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पवार यांनी कपिलधार येथील तीर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टीने तयार करण्यात आलेला आराखडा सादर केला.

प्रसंगी मंत्री महोदयांनी शिवभोजन केंद्रांचे स्थिती व या योजनेचे अंमलबजावणी, जल जीवन मिशन मधील कामा बाबत आढावा, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते कामांच्या बाबत नियोजन आराखडा या अनुषंगाने माहिती घेऊन सूचना केल्या.