स्पाइस जेटचा पुन्हा धक्का; शिर्डीचे विमान नाशिकहून उड्डाण

नाशिक,२​९​ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- स्पाइस जेट कंपनीने आपले धक्का तंत्र सुरूच ठेवले असून आज सायंकाळी साडेपाच वाजता शिर्डी वरून तिरुपतीला उड्डाण करणारे विमान हे तांत्रिक कारण सांगून नाशिकहून टेक ऑफ करणार असल्याचं जाहीर केले. त्यामुळे प्रवाशांची धावपळ झाली.

शिर्डीला गेलेले प्रवासी विमान कंपनीने नाशिकमध्ये परत आणले असले तरी नाशिकहून जाणाऱ्या अनेक प्रवाशांना अर्धवट स्थितीत प्रवास करून सिन्नर- नाशिकरोडहून पुन्हा नाशिकला यावे लागले. दोन दिवसांपूर्वी कंपनीने नाशिकच्या ओझर येथील दिल्लीला विमान पाठवताना त्यातील प्रवाशांचे लगेज हे ओझरवरच ठेवले होते. त्याची पूर्वकल्पना प्रवाशांना देण्यात आली नव्हती.

त्यामुळे दिल्ली विमानतळावर प्रवासी उतरल्यावर गोंधळ झाला होता त्यानंतर ओझर येथून टेम्पोने प्रवाशांचे बॅगेज हे मुंबईला नेऊन तेथून पुन्हा मध्यरात्री दिल्लीला विमानतळावर पाठवण्यात आले. त्यामुळे प्रवाशांच्या हाल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा आणखी एक धक्का कंपनीने दिला आहे आज शिर्डी ते तिरुपती हे विमान साडेपाच वाजता शिर्डी विमानतळावरून उड्डाण करणार होते.

मात्र तांत्रिक कारणामुळे ते आता नाशिकहून उड्डाण करणार असून विमान सेवेची वेळ बदलण्यात आली आहे साडेपाचला शेड्युल असलेले विमान आता नाशिकच्या ओझर विमानतळावरून साडेसात वाजता निघणार आहे.