चित्रपट निर्मात्याने पत्नीला कारने चिरडले

मुंबई : चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्रा याने त्याची पत्नी आणि अभिनेत्री यास्मिनला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी मुंबईत अंबाला पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कमल किशोर मिश्राच्या पत्नीने त्याला अंधेरी (पश्चिम) येथील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये दुसऱ्या महिलेसोबत कारमध्ये बसलेले पाहिले. त्यांच्यात अश्लील चाळे सुरु होते. त्या दोघांना एकत्र पाहून मिश्राच्या पत्नीने गाडीच्या काचेवर टकटक केली आणि काच खाली करण्यास सांगितले. मात्र मिश्राने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याने पत्नीला कारने चिरडले. या घटनेत त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. महिलेच्या हाताला, पायाला आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. ही घटना १९ ऑक्टोबर रोजी घडली.

कमल किशोर मिश्रा याची पत्नी यास्मिनने त्याच्यावर आरोप करताना सांगितले की, ‘मी १९ ऑक्टोबरला घरी पोहोचले तेव्हा तो (पती) त्याच्या कारमध्ये बसून मॉडेल आयेशा सुप्रिया मेमनसोबत अश्लील चाळे करत होता. ते दोघे खूप जवळ होते. दोघांना एकत्र पाहून मी गाडीची काच ठोठावली आणि काही तरी बोलायचे आहे म्हणून काच खाली करायला सांगितली, पण कमल किशोर मिश्रा याने माझे ऐकले नाही आणि गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला.’

यास्मिन पुढे म्हणाली, ‘मी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्याने मला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे माझ्या डोक्याला खूप दुखापत झाली आहे. कमल किशोर मिश्रा यांनी माणुसकी दाखवली नाही आणि गाडीतून खाली उतरून मी जिवंत आहे की मेला हेही पाहिले नाही. आमचे ९ वर्षांचे नाते आहे, पण त्या व्यक्तीने माझ्याबद्दल ९ सेकंदही विचार केला नाही,’ असे यास्मिनने सांगितले.

कमलवर गंभीर आरोप करताना यास्मिन म्हणाली, ‘कमल किशोर मिश्रा नवीन मुलींना त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतो, त्यांना त्याच्या संपत्तीबद्दल सांगतो, मुलींसाठी खूप शॉपिंग करतो. अशा प्रकारे त्याने अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. त्याने आयेशा सुप्रिया नावाच्या मुलीशी ६ मार्च रोजी लग्न केल्याचा माझ्याकडे पुरावा आहे,’ असेही यास्मिनने सांगितले.

यास्मिनने पुढे सांगितले, ‘आयेशा आणि कमल पती-पत्नी म्हणून एकत्र राहू लागले. त्यानंतर कमलने मला मारहाण केली आणि ‘तलाक तलाक तलाक’ म्हणत घराबाहेर हाकलून दिले. यास्मिनने पोलिसांवर कारवाई करत नसल्याचा आरोप करत पुढे सांगितले की, ‘मी या संपूर्ण घटनेची तक्रार अंबोली पोलिस ठाण्यात केली आहे. मात्र, आजतागायत त्यांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केलेली नाही,’ असे यास्मिन म्हणाली.

कलम मिश्रा मुळचा उत्तर प्रदेशातील आहे. त्याने २०१९ मध्ये निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले होते. त्याच्या निर्मिती संस्थेतून भूतियापा, फ्लॅट नंबर ४२०, शर्माजी की लग गई, देहाती डिस्को, खली बी या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे.