देशात सहा महिन्यांतील सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद

लसीकरणाने 219.56 कोटी मात्रांची संख्या केली पार

नवी दिल्ली : कोरोना रुग्णसंख्या सध्या नियंत्रणात असून देशात सोमवारी गेल्या १८८ दिवसांतील सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात चोवीस तासांत १३३४ नवीन कोरोना विषाणूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. या नवीन कोरोना रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ कोटी ४६ लाख ४४ हजार ७६ झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २३ हजार १९३ वर घसरली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी नवीन आकडेवारी जारी करत ही माहिती दिली.

देशातील कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. रविवारच्या तुलनेत देशात ६६० रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सोमवारी देशात १३३४ रुग्ण आढळले असून गेल्या २४ तासांत १६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. रविवारी देशात १९९९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद आणि चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. भारतात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २३ हजार ४३२ वरून २३ हजार १९३ वर घसरली आहे. देशातील कोरोना रुग्णांचा सकारात्मकता दर ०.०५ टक्के आणि पॉझिटिव्हीटी रेट १.५२ टक्क्यांवर आहे. तसेच देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.७६ टक्के आहे.

दिवसभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे ४२ हजार ८६४ डोस देण्यात आले आहेत. राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण २१९.५६ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये ९५ कोटी लोकांना दुसरा डोस आणि २२.०३ कोटी बूस्टर डोस देण्यात आले. सध्या देशात २३ हजार १९३ रुग्ण कोरोना उपचाराधीन आहेत. गेल्या २४ तासांत १ हजार ५५७ रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 219.56 (2,19,56,41,807) कोटींची संख्या ओलांडली आहे. 

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4.12 (4,12,35,971) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक खबरदारीच्या मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.