‘सीतरंग’ चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार

कोलकाता : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचे रविवारी संध्याकाळी चक्रीवादळात रुपांतरित झाले आहे. हे चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीकडे सरकत असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली. थायलँडने या चक्रीवादळाला ‘सीतरंग’ असे नाव दिले आहे. आयएमडीनुसार, मंगळवारी सकाळी चक्रीवादळ बांगलादेशातील टिकोना बेट आणि सनद्वीप यांच्यामध्ये धडकू शकते.

हवामान विभागाने सांगितले की, रविवारी सायंकाळी ५.३० वाजता चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील सागर बेटापासून ५८० किमी दक्षिणेकडे आणि बांगलादेशातील बारिसालपासून ७४० किमी दक्षिण-नैऋत्य दिशेने सरकत होते. आयएमडीच्या मते, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो. पश्चिम बंगालच्या किनारी भागांत मुसळधार पाऊस आणि १०० किमी प्रतितास वेगाने वाऱ्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याने यापूर्वी अंदाज वर्तवला होता की, रविवारी सकाळी सागर बेटाच्या दक्षिणेला ७०० किमी अंतरावर असलेली हवामान परिस्थिती वायव्य दिशेकडे सरकत आहे आणि सोमवारी ती पुन्हा उत्तर-पूर्वेकडे वळेल आणि टिकोना बेटामार्गे बांगलादेश किनारपट्टी पार करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामान खात्याने सांगितले होते की, सोमवारी दक्षिण २४ परगणा आणि उत्तर २४ परगणा तसेच, पूर्व आणि पश्चिम मिदनापूरच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोलकाता, हावडा आणि हुगळीत सोमवार आणि मंगळवारी रिमझिम पाऊस पडू शकतो.