नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्या-राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई ,२० ऑक्टोबर /प्रतिनिधी :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाला निर्देश देण्यात आले.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे.  जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

परतीच्या पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे काढणीला आलेले पीक आडवे झाले आहे. शेतात पाणी साचले आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. यावर्षी पीक परिस्थिती अत्यंत चांगली असल्यामुळे शेतकरी राजा सुखावला असतानाच परतीच्या पावसामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले. यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर ऐन दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या तोंडावर आर्थिक संकट उभे राहिले आहे.