अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा; ७५५ कोटी रूपयांचे आर्थिक सहाय्य

मुंबई,१३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- जून ते ऑगस्ट 2022 पर्यंत राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभाग यांनी जारी केला आहे.

या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली होती.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करुन जिल्ह्यांना निधी वितरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आज मदत व पुनर्वसन विभागाने ७५५ कोटी 69 लाख 43 हजार रुपयांच्या निधीचे औरंगाबाद, अमरावती आणि पुणे विभागातील नऊ जिल्ह्यांना वितरण करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या निर्णयामुळे  शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

एकूण ७५५ कोटी रु. पैकी औरंगाबाद विभागास 59754.03 लाख, अमरावती विभाग 5113.31 लाख, पुणे विभागास 10702.09 लाख इतका निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मंजूर करण्यात आला आहे.

जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेत जिरायती पिकांसाठी १३,६०० रूपये, बागायत पिकांसाठी २७,००० रूपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी ३६,००० रूपये निधी वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.