सुमारे  502 कोटी रुपयांचा कोकेनचा अवैध साठा महसूल गुप्तवार्ता संचालनालयाकडून जप्त

मुंबई ,८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- महसूल गुप्तवार्ता संचालनालयान आज दि 8 ऑक्टोबर 2022 रोजी जारी केलेल्या निवेदनानुसार दक्षिण आफ्रिकेतून आयात होत असलेला सुमारे पाचशे दोन कोटी रुपये किंमतीचा कोकेनचा अवैध साठा जप्त केला आहे.

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या मुंबई विभागीय युनिटला प्राप्त झालेल्या गुप्त माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेतून पेअर आणि नास्पती या फळांनी भरलेल्या एका कंटेनरची वाहतूक 6 ऑक्टोबर 2022 रोजी न्हावाशेवा इथं संशयावरून रोखण्यात आली. या कंटेनरची तपासणी केली असता त्यात खोक्यांमध्ये या फळांच्या आड प्रत्येकी सुमारे एक किलोग्रॅम वजनाच्या उच्च दर्जाच्या कोकेन पासून बनवलेल्या विटा लपवलेल्या आढळून आल्या. या 50.23 किलोग्रॅम वजनाच्या 50 विटांची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत 502  कोटी रुपये असल्याचं तपासाअंती निदर्शनास आलं.

दक्षिण आफ्रिकेतून याआधी आयात करण्यात आलेल्या संत्र्यांच्या आड लपवून आणलेला 198 kg मेथ आणि नऊ किलोग्राम कोकेन साठ्याच्या तस्करीप्रकरणी वाशी इथं महसूल गुप्तवार्ता  संचालनालयान जप्त केलेल्या घटनेत अटक करण्यात आलेल्या आरोपीच्याच नावान ही अवैध तस्करीही होत असल्याचं आढळून आलं आहे. गेल्या काही दिवसात समुद्री मार्गाने कंटेनर मधून तस्करी करण्यात येत असलेला हा आणखी एक मोठा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

एनडीपीएस कायदा 1985 नुसार या आरोपीला अटक करण्यात आली आहे. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या मुंबई प्विभागीय युनिटकडून गेल्या दहा दिवसात 198 किलो मेथामफेटामाईन आणि नऊ किलो कोकेन ते 16 किलो हेरॉईन असे अंमली पदार्थांचे मोठे साठे  गेल्या दहा दिवसांच्या कालावधीत  जप्त करण्यात आले आहेत.