नाशिकमध्ये एसटी पेटली, सर्व प्रवासी बचावले

नाशिक,८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-नाशिकमध्ये खासगी बसला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच वणी येथे सप्तशृंगी गडाकडे जाणा-या राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरी बसने अचानक पेट घेतला. काही कळण्याच्या आतच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने या बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

नाशिकच्या वणी गडावर जाणाऱ्या या चालत्या बसने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत प्रवाशी खाली उतरले. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. नांदुरीहून वनी गडावर ही बस जात होती.

दुपारी बारा वाजेच्या दरम्यान श्री सप्तशृंग गड येथे ग्रामपंचायतच्या टोलनाक्याच्या जवळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. एसटी बस पिंपळगाव बसवंत डेपोची होती. (बस क्रमांक एम एच 14 बीटी 3752) प्रसंगावधान राखून चालक आणि वाहक यांनी सर्व प्रवाशांना खाली उतरवले. यात्रा नियंत्रण समितीने तातडीने तेथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक स्वयंसेवक, विश्वस्त संस्थेचे सुरक्षा कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, रोप वे कर्मचारी आदी यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करून फायर एक्स्टिंविशर द्वारे तातडीने आग विझविली.

सर्वांनी प्रसंगावधान राखून वेळीच उपाययोजना योग्य प्रकारे राबविल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमध्ये कुठल्याही भाविकाला अथवा कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारे इजा झालेली नसून सर्व सुरक्षित आहेत. भाविकांनी कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा महसूल, पोलीस व ट्रस्ट प्रशासन तसेच स्थानिक ग्रामपंचायत तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.