समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा १२० किमी राहणार

दुचाकी, तीन चाकी वाहनांना प्रवेश नाही

मुंबई : समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा १२० किमी राहणार असून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच, समृद्धी महार्गावर दुचाकी, चारचाकी रिक्षा अणि तीन चाकी रिक्षा, तसेच तीन चाकी कोणत्याही वाहनांना संचार करण्याची परवानगी नाही. यासंदर्भात वाहतूक विभाग अप्पर डीजीपींकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिसूचनेत वेगमर्यादा १२० किमी एवढी निश्चित करण्यात आली आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कुलवंत सारंगल यांनी ही अधिसूचना जारी केली आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सुरू करण्यासंबंधी सरकारकडून वारंवार तारखाही घोषित करण्यात आल्या. यापूर्वी ऑक्टोबर २०२१, ३१ डिसेंबर २०२१ आणि आता ३१ मार्च २०२२ ही तारीख देण्यात आली होती. पण आता ऑक्टोबर उजाडूनही समृद्धी महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने उद्घाटनाला मुहूर्त काही गवसत नाही.

अनेकदा कामाचा दर्जा, काम सुरु असताना झालेल्या दुर्घटना यांमुळे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन कायम पुढे पडत गेले. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी अजूनही हा महामार्ग खुला करण्यात आलेला नाही. एकूण १६ टप्प्यांत या महामार्गाचे बांधकाम सुरू असून एकंदरीत नागपूर मुंबई या ७०१ किलोमीटरच्या महामार्गात एकूण १६९९ ठिकाणी छोटी मोठी बांधकामे असून यातील जवळपास १४०० च्यावर बांधकामे पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणचे काम अद्याप शिल्लक आहे.

नागपूर-मुंबई दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशानं ३१ जुलै २०१५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ७०१ किलोमीटरच्या ‘समृद्धी महामार्गाची’ घोषणा विधानसभेत केली. प्रत्यक्षात राज्याच्या १० जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण २४ जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. या महामार्गाच्या बांधकामाच्या सुरुवातीला अनेक अडचणी आल्या आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यावेळी हा महामार्ग पूर्ण सुरू होण्याची प्रस्तावित तारीख ही ऑक्टोबर २०२१ अशी ठरविण्यात आली होती. पण मध्यंतरी जमीन अधिग्रहण, कोरोनामुळे लॉकडाऊन अशा अनेक अडचणींना सामोरे जात सरकारने हा महामार्ग जवळपास पूर्णत्वाला नेला आहे.