खादीला जागतिक दर्जाचा ब्रँड बनवण्यासाठी खादीला प्रोत्साहन देण्याचे केले आवाहन

केंद्रीय सूक्ष्म, लघु तथा मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते ‘खादी फेस्ट-2022’चे मुंबईत उद्घाटन

मुंबई ,३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- “महात्मा गांधींचे अंत्योदयाचे स्वप्न साकारण्यासाठी मुंबईत आयोजित ‘खादी फेस्ट’चा हातभार लागत असून, देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या विणकर आणि कारागिरांना तसेच पीएमईजीपी म्हणजे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत स्वयंरोजगार मिळवणाऱ्या तरुणांना, या महोत्सवामुळे काम मिळण्याबरोबरच विक्री आणि व्यवसाय करण्यासाठी एक मंच उपलब्ध होतो”, असे उद्गार केंद्रीय सूक्ष्म, लघु तथा मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी काढले.

खादीला जागतिक दर्जाचा ब्रँड बनवण्यासाठी खादीला प्रोत्साहन देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मुंबईत खादी ग्रामोद्योग आयोगाच्या केंद्रीय कार्यालयात ‘खादी फेस्ट’ या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. दरवर्षी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त मुंबईत खादी फेस्ट हे प्रदर्शन भरवले जाते. कोरोनामुळे तीन वर्षे खंड पडल्यानंतर आज या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी आयोगाचे अध्यक्ष मनोजकुमार गोयल उपस्थित होते.

‘आपल्याकडील वस्त्रप्रावरणांमध्ये खादीच्या किमान एका वस्त्राचा समावेश करण्याचे’ आवाहन पंतप्रधानांनी अनेकदा केले असल्याचा उल्लेख करत, ‘आपल्या विणकर आणि कारागिरांनी केलेल्या वस्तूंची खरेदी करून सणासुदीच्या दिवसांत त्यांनाही आनंद द्यावा’, अशी अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली. अशा प्रदर्शनांमुळे खादी ग्रामोद्योग वस्तूंच्या विक्रेत्यांना सहजपणे बाजारपेठेत पोहोचता येत असून, त्यामुळेच वर्ष 2021-22 मध्ये या वस्तूंचे निर्यातमूल्य 257.02 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले, अशी माहितीही मंत्रिमहोदयांनी दिली.

गेल्या वर्षभरात आयोगाने देशविदेशात भरवलेल्या आणि भाग घेतलेल्या प्रदर्शनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. गेल्या नोव्हेंबरमध्ये नवी दिल्लीत प्रगती मैदानावर भरलेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात खादीच्या वस्त्रांची एकूण विक्री 1.58 कोटी रुपये तर ग्रामोद्योगातून उत्पादित झालेल्या वस्तूंची विक्री एकूण 1.30 कोटी रुपये इतकी झाल्याचे त्यांनी सांगितले.

देशाच्या विकासात योगदान देण्याची आणि आत्मनिर्भर भारताच्या लक्ष्यपूर्तीचीही जबाबदारी आयोगावर आहेच, त्याशिवाय युवकांना आकर्षित करण्यासाठी नवनवी डिझाइन्स खादीच्या वस्त्रांमध्ये तयार करण्याची जबाबदारी त्यातल्या तज्ज्ञांवरही आहे, असेही ते म्हणाले. भारतीय फॅशनच्या विश्वात इतर उद्योगांच्या तुलनेतील खादीचे स्थान वेळोवेळी अभ्यासण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

खादी फेस्टचे दीपप्रज्वलन आणि उद्घाटन केल्यानंतर राणे यांनी ग्रामोद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आणि त्यांच्या हितासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.

खादी ग्रामोद्योग आयोग म्हणजे स्वयंरोजगाराच्या नवनव्या प्रवाहांना जन्म देणारी आणि महात्मा गांधींचे अंत्योदयाचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारी संस्था आहे, असे मत मनोजकुमार गोयल यांनी मांडले. ‘प्रत्येक हाताला काम’ देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकारण्यासाठीही आयोग प्रयत्नरत असल्याचे त्यांनी सांगितले. सणासुदीला आवर्जून खादी ग्रामोद्योगाची उत्पादने विकत घेण्याचे आवाहन करत, यावर्षीही खादीची विक्रमी विक्री होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आज उद्घाटन झालेल्या प्रदर्शनात देशाच्या विविध भागांत खादी ग्रामोद्योगाद्वारे तयार झालेल्या वस्तू विक्रीसाठी मांडण्यात आल्या आहेत. यांमध्ये सुकामेवा, चहा, कहावा, वनस्पतिजन्य सौंदर्यप्रसाधने, खादी रेशीम, पश्मीना, पोलीवस्त्र, सोलर वस्त्र, मधुबनी प्रिंट, मध, गृहसजावटीच्या वस्तू, चामड्याच्या वस्तू आदी अनेक उत्पादनांचा समावेश आहे. येत्या 1 नोव्हेंबर पर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे.