फायबर केबल लोकार्पण:अंदमानला प्रेमपूर्वक भेट-पंतप्रधान

अंदमान आणि निकोबार बेटांना जोडणाऱ्या आधुनिक यंत्रणेच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2020

भारतीय स्वातंत्र्याची तपोभूमि, संकल्पभूमि असलेल्या अंदमान व निकोबार भूमीला व तेथील सर्व नागरिकांना माझा नमस्कार !!!

Image

अंदमान आणि निकोबारच्या डझनभर बेटांवर वास्तव्यास असलेल्या लाखो साथीदारांसाठी आजचा दिवस जसा महत्त्वाचा आहे तसाच तो संपूर्ण देशासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे.

मित्रहो, सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करून मला सुमारे दीड वर्षांपूर्वी समुद्रांतर्गत ऑप्टिकल फायबर  केबल जोडणी प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळाली. मला आनंद आहे कि ते काम आत्ता पूर्ण झाले आहे आणि आज या यंत्रणेच्या लोकार्पणाचे भाग्यही मला लाभले आहे. चेन्नई ते पोर्ट ब्लेअर, पोर्ट ब्लेअर ते लिटल अंदमान आणि पोर्ट ब्लेअर ते स्वराज बेट अशी सेवा अंदमान निकोबारच्या मोठ्या भागात आजपासून सुरू झाली आहे.

या सुविधेबद्दल, अगणित संधी उपलब्ध करून देणाऱ्या या जोडणीबद्दल मी अंदमान आणि निकोबारच्या लोकांचे अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर, 15 ऑगस्टच्या आधीच्या आठवड्यात अंदमानच्या लोकांना लाभलेली ही एक प्रकारची प्रेमपूर्वक भेट आहे असे मी मानतो.

मित्रहो, सुमारे 2300 किलोमीटरवर समुद्रात केबल्स टाकण्याचे हे काम नियोजित वेळे आधी पूर्ण करणे ही गोष्ट अतिशय प्रशंसनीय आहे. खोल समुद्रात सर्वेक्षण करणे, केबलची गुणवत्ता कायम राखणे आणि विशेष जहाजांद्वारे केबल टाकणे हे काम निश्चितच सोपे नव्हते; त्यात वरुन उंच लाटा, वादळ आणि पावसाचा व्यत्यय. हा प्रकल्प जितका मोठा होता तितकीच आव्हाने सुद्धा मोठी होती. हे देखील एक कारण होते की वर्षानुवर्षे या सुविधेची आवश्यकता असूनही त्यावर काम झाले नव्हते. परंतु मला आनंद आहे की सर्व अडथळे पार करीत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. इतकेच काय तर कोरोनासारख्या संकटात सर्व काही ठप्प झाले असतानाही हे काम पूर्ण करण्यात त्याद्वारे कोणतीही बाधा आली नाही.

मित्रहो, देशाच्या इतिहासासाठी, वर्तमानासाठी आणि भविष्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या स्थळाला तसेच तेथील कष्टकरी लोकांना आधुनिक दूरसंचार जोडणी पुरविणे ही देशाची जबाबदारी होती. कामाप्रती अतिशय समर्पित अशा पथकाद्वारे, सांघिक भावनेतून आज, एक खूप वर्षांपासूनचे स्वप्न साकार झाले आहे. मी या प्रकल्पाशी संबंधित प्रत्येक हितधारकाचे अभिनंदन करतो, त्यांना प्रणाम करतो.

मित्रहो, अशी आव्हानात्मक कामे केवळ तेव्हाच केली जाऊ शकतात जेव्हा ते कार्य पूर्ण वचनबद्धतेसह, पूर्ण क्षमतेने केले जाईल. आमची हीच समर्पित भावना राहिली आहे कि प्रत्येक क्षेत्रात दिल्ली आणि मन यातील अंतर  देशातील प्रत्येक नागरिकाने दूर केले पाहिजे. देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक क्षेत्रापर्यंत आधुनिक सुविधा पोहोचविणे आणि त्यांचे जीवन सुकर व्हावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित सीमाभाग आणि सागरी क्षेत्रांचा वेगवान विकास करण्यावर आमचा भर राहिला आहे.

मित्रहो, अंदमान आणि निकोबारला उर्वरित देश आणि जगाशी जोडणारा हा  प्रकल्प सुकर जीवनशैलीप्रति असलेल्या कटिबध्दतेचे प्रतीक आहे. आता अंदमान आणि निकोबारमधील लोकांना मोबाइल जोडणी आणि वेगवान इंटरनेट सारख्या स्वस्त आणि चांगल्या सुविधा मिळू शकतील, ज्यासाठी आज भारत संपूर्ण जगात आघाडीवर आहे. आता अंदमान आणि निकोबारमधील लोक, भगिनी, मुले, तरूण, व्यापारी आणि उद्योजक यांनाही डिजिटल इंडियाचा सर्व लाभ मिळू शकेल, जो देशातील उर्वरित लोकांना मिळत आहे. ऑनलाईन शिक्षण असो, पर्यटन, बँकिंग, वस्तूंची खरेदी किंवा औषधे मागवायची असोत; आता अंदमान आणि निकोबारच्या हजारो कुटुंबांनाही आता हे सर्व लाभ ऑनलाइन मिळू शकतील.

मित्रहो, अंदमानला आज मिळालेल्या सुविधांचा लाभ तेथील पर्यटकांनाही मिळणार आहे. उत्तम इंटरनेट जोडणी ही आज कोणत्याही पर्यटनस्थळाची पहिली प्राधान्य बाब ठरली आहे. यापूर्वी, देशातील आणि जगातील पर्यटकांमध्ये मोबाइल आणि इंटरनेट जोडणीचा अभाव होता. त्यांचा आपल्या कुटुंबाशी, उद्योधंद्याशी असलेल्या संपर्कात खंड पडत होता. तो सतत एक प्रकारे त्याच्या कुटुंबापासून दूर गेला. आता ही उणीवही संपणार आहे. आता इंटरनेट चांगले मिळाल्यावर, मला खात्री आहे की लोक जास्त काळासाठी तेथे येतील. जेव्हा लोक जास्त वास्तव्य करतील,  अंदमान आणि निकोबारच्या समुद्राचा आणि तेथील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतील तेव्हा त्याचा मोठा प्रभाव रोजगारावरही दिसून येईल; रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील.

मित्रहो, अंदमान आणि निकोबार हे भारताचे आर्थिक-सामरिक सहकार्य आणि समन्वयाचे मुख्य केंद्र आहे. हिंदी महासागर हा हजारो वर्षांपासून भारताच्या व्यापार आणि सामरिक पराक्रमाचे केंद्र आहे. आता भारत जेव्हा इंडो-पॅसिफिकमधील व्यापार आणि सहकार्याच्या नव्या धोरणानुसार, रिवाजानुसार मार्गक्रमण करीत आहे तेव्हा  अंदमान आणि निकोबारसह आमच्या सर्वच बेटांचे महत्त्व प्रकर्षाने वाढले आहे. पूर्वेकडील धोरणानुसार पूर्व आशियाई देश आणि समुद्राशी जोडलेल्या इतर देशांशी भारताच्या मजबूत संबंधांमध्ये अंदमान आणि निकोबारची भूमिका खूपच जास्त आहे आणि ती अव्याहतपणे वाढणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटांच्या या भूमिकेला बळकटी देण्यासाठी नव्या भारतात  3 वर्षांपूर्वी बेट विकास संस्था स्थापन केली गेली. आज आपण पहात आहात की अंदमान निकोबारमध्ये वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प आता वेगाने पूर्ण होत आहेत.

मित्रहो, अंदमान आणि निकोबारच्या 12 बेटांवर हाय इम्पॅक्ट प्रकल्पांचा विस्तार केला जात आहे. मोबाइल आणि इंटरनेट जोडणीची एक मोठी समस्या आज दूर झाली आहे. याशिवाय रस्ते, हवाईमार्ग आणि जलमार्गाद्वारे प्रत्यक्ष संपर्कही वाढविण्यावर जोर आहे. उत्तर आणि मध्य अंदमानच्या रस्ते जोडणीस बळकटी देण्यासाठी दोन मोठे पूल व एनएच-4 रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. पोर्ट ब्लेअर विमानतळावर एकाच वेळी 1200 प्रवाशांना हाताळण्याची क्षमता येत्या काही महिन्यांत तयार होईल.

याशिवाय दिग्लीपुर, कार निकोबार आणि कॅम्पबेल-बे मधील विमानतळही कार्यान्वयनासाठी सज्ज झाले आहेत. पॅसेंजर टर्मिनल, स्वराज बेटातील फ्लोटिंग जेट्टी, शहीद बेट आणि लाँग आयलँड सारख्या वॉटर एयरोड्रम पायाभूत सुविधाही येत्या काही महिन्यांत तयार होतील. यानंतर उडान योजनेंतर्गत समुद्री विमान सेवा येथे सुरू होईल. या माध्यमातून दोन बेटांमधील दळणवळण वाढेल आणि प्रवासाचा कालावधी देखील कमी होईल.

मित्रहो, बेटे व उर्वरित देशांदरम्यान जलवाहिनीची सुविधा वाढविण्यासाठी कोची जहाज बांधणी कारखान्यात तयार होणारी 4 जहाजेही येत्या काही महिन्यांत ताब्यात मिळतील. पुढील एका वर्षात मोठ्या जहाजांची दुरुस्ती करण्याची सुविधा त्याच बेटावर विकसित केली जावी असा प्रयत्न असेल. याद्वारे तुमचा वेळ वाचवेल, खर्च कमी होईल आणि रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. याचा मत्स्यव्यवसाय क्षेत्रालाही मोठा फायदा होईल.

मित्रहो, अंदमान आणि निकोबार येत्या काळात बंदर आघाडी विकास केंद्र हब म्हणून विकसित होणार आहे. अंदमान निकोबार जगातील बर्‍याच बंदरांपासून अगदी स्पर्धात्मक अंतरावर आहे. आज संपूर्ण जग हे गृहित धरत आहे की ज्या देशात बंदरांचे जाळे व त्यांचे संपर्क अधिक चांगले असेल तेच 21 व्या शतकाच्या व्यापाराला गती देईल. अशा परिस्थितीत अंदमान आणि निकोबारमधील पायाभूत सुविधांशी संबंधित कामकाज त्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेईल.

मित्रहो, आज जेव्हा भारत आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेतून वाटचाल करीत आहे, जागतिक उत्पादक हब म्हणून जागतिक पुरवठादार व मूल्य साखळीच्या महत्वपूर्ण भूमिकेतून स्वतःला सिद्ध करण्यात गुंतला आहे, तेव्हा आपले जलमार्ग आणि आमच्या बंदरांचे जाळे सक्षम करणे गरजेचे आहे. गेल्या सहा ते सात वर्षांपासून बंदर विकास आणि   बंदर आघाडी विकासाच्या दृष्टीने जे काम होत आहे त्याद्वारे देशाला नवीन बळ मिळत आहे.

आज आपण नदी जलमार्गाचे एक मोठे जाळे तयार करीत आहोत जे समुद्रावरील मोठ्या बंदरांना देशातील भूमीशी जोडणी नसणाऱ्या राज्यांशी जोडत आहे. बंदरांच्या पायाभूत सुविधा विकासातील कायदेशीर अडथळेही सतत दूर केले जात आहेत. सरकारचे लक्ष समुद्रात व्यवसाय सुलभीकरणाला प्रोत्साहन देणे आणि सागरी रसद सुलभ करण्यावर आहे. जगातील सर्वात मोठे एकल खिडकी योजना विकसित करण्याचे कामही सुरू आहे.

मित्रहो, अशा बर्‍याच प्रयत्नांमुळे आता देशाच्या बंदर नेटवर्कची क्षमता व कार्यकुशलता या दोन्ही गोष्टींचा विस्तार होत आहे. 3 दशकांच्या प्रतीक्षेनंतर पश्चिम किनारपट्टीतील भारताच्या पहिल्या सखोल आराखड्यात ग्रीनफील्ड समुद्र बंदराला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पूर्व किनारपट्टीवर अंतर्गत बंदर बांधण्याच्या विस्तृत मसुद्यावरही वेगाने काम सुरू आहे.

आता ग्रेट निकोबारमध्ये अंदाजे 10 हजार कोटी रुपये खर्चाच्या मालवाहू जहाजासाठी बंदर बांधण्याचा प्रस्ताव आहे. येत्या 4-5 वर्षात याचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. एकदा हे बंदर तयार झाले की मोठी जहाजे देखील येथे लागू शकतील. यामुळे सागरी व्यापारात भारताचा वाटा वाढेल, आपल्या तरुणांना नवीन संधी मिळतील.

मित्रहो, आज अंदमान आणि निकोबारमध्ये जितक्या आधुनिक पायाभूत सुविधा तयार केल्या जात आहेत, त्या समुद्री अर्थव्यवस्थेलाही गती देतील. मासेमारी, मत्स्यपालन आणि सागरी शैवाल शेती हा सागरी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. शेवाळाच्या फायद्यांबद्दल आज जगात चर्चा होत आहे, बरेच देश त्याची शक्यताही आजमावून पाहत आहेत. मला आनंद होत आहे की अंदमान आणि निकोबारमधील पोर्ट ब्लेअरमध्ये त्याच्या संभाव्यतेचा अभ्यास करण्यासाठी केलेल्या पथदर्शी प्रकल्पांचे निकाल उत्साहवर्धक आहेत. आता या बेटांवर त्याच्या लागवडीस चालना देण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. हे प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्यास त्याचा विस्तार देशातील इतर ठिकाणीही होऊ शकतो. याचा विशेषतः आमच्या मच्छिमारांना खूप मोठा फायदा होईल. मला आशा आहे की या दशकात आमचे प्रयत्न अंदमान-निकोबारला, तेथील लोकांना नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच जागतिक पर्यटन नकाशामध्ये एक प्रमुख स्थान मिळवून देतील.

पुन्हा एकदा मी आपणा सर्व अंदमान-निकोबार मधील नागरिकांचे मोबाइल फोन व इंटरनेट जोडणीच्या या आधुनिक सुविधेबद्दल अभिनंदन करतो आणि आता जेव्हा कोरोनाचा काळ सुरु आहे, तेव्हा मी विशेषत्वाने तुमच्यासाठी प्रार्थना करतो कि तुम्ही निरोगी राहा, सुरक्षित रहा, तुमचे कुटुंब निरोगी राहो. रहा, कोरोनाच्या या काळात ‘दो गज दूरी’ अंतराचे नेहमीच पालन करा आणि पुढे मार्गक्रमण करा.

या मनोकामनेसह, स्वातंत्र्याच्या या तपोभूमिला आणि आज 15 ऑगस्टच्या आधी माझे सर्वोत्तम देण्याची संधी मला मिळाली आहे. स्वातंत्र्याच्या सणाच्या अगोदर 15 ऑगस्टपूर्वीच्या या मोठ्या प्रसंगी मी आपणा सर्वांचेही अभिनंदन करतो आणि उज्ज्वल भविष्यात नवीन झेप घेण्यास पुढे येण्याचे आवाहन करतो.

खूप खूप धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *