अंदमानमध्ये आता ‘सुपर डिजिटल हायवे’; मराठी अधिकारी बुरडे यांची कर्तबगारी

नवी दिल्ली, १० : अंदमान व निकोबार बेटांना आजपासून मिळणाऱ्या जलद संचार सेवांमुळे स्थानिकांना नव्या संधी उपलब्ध होतील तसेच सबमरीन ऑप्टीकल फायबर केबलमुळे आता सुपर डिजिटल हायवे तयार झाला असल्याची प्रतिक्रिया युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (युएसओएफ) चे संचालक विलास बुरडे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला दिली.

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार विभागांतर्गत युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (युएसओएफ) विभाग येतो. या विभागाच्या देखरेखीतच चेन्नई ते अंदमान व निकोबार दरम्यान २३०० किलो मीटर लांबीची सबमरीन ऑप्टीकल फायबर केबल समुद्रात टाकण्यात आली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले, असल्याचा आनंद श्री.बुरडे यांनी व्यक्त केला.

विलास बुरडे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री.बुरडे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या भेटी दरम्यान त्यांनी सदर प्रकल्पाविषयीची माहिती दिली. वर्ष २०१६ मध्ये श्री.बुरडे यांनी  युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (युएसओएफ) मध्ये संचालक पदाचा कार्यभार सांभाळला. त्यांच्याकडे अंदमान व निकोबार आणि लक्षद्वीप बेटांमधील दूरसंचार सेवा अधिक सुलभ करण्यासबंधीची जबाबदारी आहे.

प्रथमत:च अशा प्रकाराची सबमरीन ऑप्टीकल फायबर केबल समुद्राच्या खाली टाकण्यात आली असल्याचे श्री. बुरडे यांनी सांगितले. ही सबमरीन केबल चेन्नई ते अंदमान व निकोबार बेटांदरम्यान आहे. ही सबमरीन ऑप्टीकल फायबर केबल २३०० किलो मीटर लांबीची आहे. यासाठी १२२४ कोटी रूपयांचा खर्च  आला आहे.  या केबलमुळे अंदमान निकोबार बेटांच्या स्थानिकांसाठी ‘सुपर डिजिटल हायवे’ तयार झाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते ३० डिसेंबर २०१८ रोजी पोर्ट ब्लेअरमध्ये केली. तेव्हापासून प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यापासून  ते पूर्णत्वास येईपर्यंतची सर्व जबाबदारी युएसओएफ चे संचालक म्हणून श्री. बुरडे यांनी पार पाडली.

सबमरीन केबल चेन्नई ते पोर्ट ब्लेअर आणि पोर्ट ब्लेअर ते स्वराज द्विप (हॅवलॉक), लिटल अंदमान, कार निकोबार, कामोरता, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड आणि रंगत या आठ द्विपांना जोडली जाणार आहे. चेन्नई ते पोर्ट ब्लेअर दरम्यान सबमरीन ओएफसी लिंक २ x २०० जीबीपीएस प्रतिसेकंद बँडविड्थ असणार आहे. पोर्ट ब्लेअर व इतर बेटांदरम्यान २ x १०० जीबीपीएस असणार आहे. यामुळे टेलिकॉम आणि ब्रॉडबँड सुविधेला गती मिळेल.

टेलिकॉम आणि ब्रॉडबँड जोडणीमुळे बेटांवर पर्यटन व्यवसायाला अधिक प्रोत्साहन मिळेल, रोजगार वाढतील, अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल आणि स्थानिक राहनीमानाचा दर्जा सुधारेल. चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे टेलिमेडिसीन आणि टेली-एज्युकेशन या ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी सुलभ होईल. लहान उद्योजकांना ई-कॉमर्समुळे संधी निर्माण होतील तर शैक्षणिक संस्था विस्तारित बँडविड्थचा वापर ई-लर्निंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण करण्यासाठी करतील.

विलास बुरडे यांच्या विषयी

विलास बुरडे वर्ष १९९५ मध्ये भारतीय दूरसंचार सेवेत रूजु झालेत. त्यांनी मुंबई, ठाणे, नाशिक आणि सुरत येथे विविध पदांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. तसेच दूरसंचार खात्याला मोठ्या प्रमाणात महसूलही गोळा करून दिला. वर्ष २०१३ ला ते दिल्लीत कर्मचारी निवड आयोगाचे (SSC) प्रादेशिक संचालक म्हणून प्रतिनियुक्तीवर होते. त्यांच्या कार्यकाळात जवळपास ३०००० उमेदवार केंद्र शासनाच्या सेवेत रूजू झाले. श्री.बुरडे दिल्लीतील विविध मराठी संस्थांमध्येही सक्रिय असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *